Hutatma Sugar Factory Protest 
सांगली

Hutatma Sugar Factory Protest : अध्यक्षांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच बोर्ड मीटिंग

सहा लाख टन गाळपाचा निर्धार : एक रुपयाही थकवणार नाही

पुढारी वृत्तसेवा

वाळवा : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विशेष म्हणजे, गेल्या 20 वर्षांत प्रथमच अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत आगामी हंगामात 6 लाख टन गाळपाचा निर्धार करण्यात आला.

कारखान्यासमोर गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, या बैठकीसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केल्याने सभा सुरळीत पार पडली. सचिव मुकेश पवार यांनी विषयसूचीचे वाचन केले. बैठकीत साखर विक्री समिती, गळीत हंगाम 2026-27 करिता झालेल्या ऊस नोंदी, तोडणी-वाहतूक करार तसेच शेती विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

वाहतूक करारातील येणेबाकी वसुली, उत्पादन, इंजिनिअरिंग आणि डिस्टिलरी विभागातील कामकाजावरही चर्चा झाली. संबंधित विभागप्रमुखांनी आपापले अहवाल सादर केले. सर्व विषयांवर तातडीने निर्णय घेण्याचे ठरले. यावेळी ऊस वाहतूक करार सुरू ठेवणे, 50 अंगद गाड्या तयार करणे, बैलगाड्यांची दुरुस्ती करणे, नादुरुस्त साहित्य भंगारात टाकणे, बिनकामाचे भंगार विक्री करणे तसेच गेल्या तीन वर्षांपासून दुरुस्ती न झालेल्या बॉयलरची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यक खातेप्रमुख व कर्मचारी भरती करून पूर्ण क्षमतेने कारखाना चालवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी हंगामात 6 लाख टन ऊस गाळप करून राज्यात उच्चांकी साखर उतारा मिळवण्याचा संकल्प संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, शेती अधिकारी सर्जेराव वावरे यांच्यासह सर्व खातेप्रमुख बैठकीस उपस्थित होते.

किरण नायकवडी म्हणाले, कारखान्याचा कारभार पारदर्शक असेल. ऊस वजन प्रक्रियेत शेतकरी, वाहनधारक आणि तोडणी मजुरांवर अन्याय होणार नाही. कार्यकारी संचालक शिवाजी पाटील यांनी आंदोलनाचा आतील कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे स्पष्ट केले. गौरव नायकवडी म्हणाले, गेल्या 40 वर्षांत मीटिंग हॉल किंवा खुर्च्या बदलल्या नाहीत. मात्र आता सर्वच बदलून महाराष्ट्रात पुन्हा हुतात्मा पॅटर्न उभा करू.

केदार नायकवडी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले. झालेले नुकसान भरून काढणे हे मोठे आव्हान आहे. वैभव नायकवडी यांनी गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण करावा लागेल. कोणाचाही एक रुपया थकणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, या सभेला 17 संचालक उपस्थित होते. गेल्या 20 वर्षांत अध्यक्षांशिवाय झालेली ही पहिलीच बोर्ड मीटिंग असल्याची चर्चा होती. कारखान्यासमोरील आंदोलनाचा शनिवारी 20 वा दिवस होता. सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी चारनंतर आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात झाली. वैभव नायकवडी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांकडून पुन्हा मांडण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT