पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप 
सांगली

Sangli Crime : पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप

मांगले येथील प्रकरण; गळा आवळून मृतदेह पेटीत लपवला

पुढारी वृत्तसेवा

​ईश्वरपूर : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा ओढणीने गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर तिचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मंगेश चंद्रकांत कांबळे (रा. मांगले, ता. शिराळा) असे शिक्षापात्र आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. १) देविदास एच. केळूसकर यांनी हा निकाल दिला. या खटल्यात अवघ्या सहा वर्षांच्या मुलाने स्वतःच्या बापाविरोधात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मंगेश याने प्रेमविवाह केला होता. तो पनवेल येथे डंपरचालक म्हणून कामाला असताना पत्नी प्राजक्ता (वय ३०), मुलगा शिवम (वय ६) आणि मुलगी शिवण्या (वय ३) यांच्यासह राहत होता. मंगेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडत असे. २१ मार्च २०२५ रोजी तो कुटुंबासह मांगले येथील मूळ गावी आला. त्यानंतर २७ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी त्याने पुन्हा प्राजक्ताशी वाद घातला. मारहाण करत ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.

मुलासमोरच मृतदेह पेटीत ठेवला

खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मंगेशने मृतदेह शेजारच्या खोलीतील लोखंडी पेटीत ठेवला आणि खोलीला कुलूप लावून पसार झाला. हा सर्व प्रकार सहा वर्षांचा मुलगा शिवम प्रत्यक्ष पाहत होता. शिवमने रडत आत्याला सर्व प्रकार सांगितल्यानंतर हत्येचा बनाव उघडकीस आला. मृत प्राजक्ता यांच्या आई रंजना चांदणे यांनी शिराळा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.

शिराळा पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी रंजना चांदणे, मुलगा शिवम, पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बनसोडे, डॉ. अनिरूद्ध काकडे, तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

बालविकास अधिकारी स्वाती शिंदे, मावशी वर्षा चांदणे व पोलिसांच्या उपस्थितीत शिवमचा जबाब नोंदवण्यात आला होता. "वडिलांनी आईला मारहाण करून गळा आवळला अन् कपड्याने बांधून मोठ्या डब्यात ठेवले", अशी साक्ष चिमुकल्या शिवमने न्यायालयात दिली. या बालकाची महत्त्वपूर्ण साक्ष या खटल्याचा मुख्य आधार ठरली.

न्यायालयाने भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) व २३८ अन्वये मंगेशला दोषी धरत जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. सतीश केकणीस यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद जाधव, सुनंदा निकम व पोलिस हवालदार उत्तम शिंदे यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT