पत्नीच्या खुनाबद्दल पतीला जन्मठेप 
सांगली

Sangli Crime : पत्नीच्या खुनाबद्दल पतीला जन्मठेप

ईश्वरपूर येथे चार वर्षांपूर्वी घटना; दोन मुलीच झाल्याने विहिरीत ढकलले

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर :दोन मुलीच झाल्याने पत्नीला विहिरीवर नेऊन पाण्यात ढकलून तिचा खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (वय ३५, रा. जावडेकर चौक, कोळीमळा, ईश्वरपूर) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश (क्र. २) आर. बी. रोटे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत (वय २९) असे पत्नीचे नाव आहे. हा प्रकार चार वर्षांपूर्वी कापूसखेड (ता. वाळवा) येथे घडला होता.

राजनंदिनी व कौस्तुभ यांना दोन मुली झाल्या होत्या. मुलगा झाला नाही या कारणावरून पती कौस्तुभ हा पत्नीला त्रास देत होता. यावरून त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. १७ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे फिरायला जाण्याच्या बहाण्याने कौस्तुभने पत्नीला सोबत नेले आणि कापूसखेड येथील विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा बनाव त्याने केला. मात्र, माहेरच्या लोकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. राजनंदिनी यांचे भाऊ मिलिंद नानासाहेब भोसले (रा. कोल्हापूर) यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही त्यांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एन. राऊत आणि तपासी अधिकारी शशिकांत चव्हाण यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. विशाल बामणे यांनी काम पाहिले. न्यायालयाने कौस्तुभ याला भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, तसेच कलम १७७ अन्वये ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहायक पोलिस उपनिरीक्षक शरद जाधव, हवालदार उत्तम शिंदे, प्रमोद आपटे, सुनील पाटील, संदीप शेटे, अरुण कानडे आणि प्रशांत देसाई यांनी यांनी सरकारी पक्षाला मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT