सांगली : जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवून घेणे बंधनकारक होते. आता ही मुदत संपल्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गुरुवारपासून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत ४२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला आहे. जिल्ह्यात अद्याप सव्वा दोन लाख वाहनांनी ही नंबर प्लेट बसवलेली नसून ही टक्केवारी ३० टक्के आहे.
जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या एकूण ५ लाख ५९ हजार २९७ वाहनांपैकी ३ लाख २४ हजार २७६ वाहनधारकांनी आतापर्यंत एचएसआरपी बसवून घेतली आहे. हे प्रमाण सुमारे ७० टक्के आहे. अद्याप एचएसआरपी नसलेल्या वाहनांची संख्या २ लाख ३५ हजार २१ आहे.
एचएसआरपीसाठी दुचाकी व ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये, तीनचाकी वाहनांसाठी ५०० रुपये, तर सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांसाठी ७४५ रुपये शुल्क आकारण्यात येत असून, जीएसटी स्वतंत्रपणे भरावा लागत आहे. शेवटची मुदत ३० जून रोजी संपली असून, आता १ जुलैपासून प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.
२०१९ पूर्वीच्या वाहनधारकांनी कोणताही दंड किंवा कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तत्काळ एचएसआरपी बसवून घ्यावी. सध्या आरटीओ विभागाकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून नंबर प्लेट न बसवता वाहन चालवताना एकाहून अधिक वेळा सापडल्यास दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे.- प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली