घराला भीषण आग लागून घरातील भारती पवार यांचा होरपळून मृत्यू झाला.  
सांगली

Sangli Fire Incident : मध्यरात्री घर पेटले; महिलेचा होरपळून मृत्यू

भाटवडे गावातील घटना; शॉर्टसर्किटचा संशय

पुढारी वृत्तसेवा

कासेगाव : वाळवा तालुक्यातील भाटवडे येथे शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कौलारू घराला भीषण आग लागून घरातील भारती सुरेश पवार (वय ४९) यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले. संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम, दागिने व अन्य साहित्य जळाले. परिणामी, लाखो रुपयांचे नुकसान झाले.

भाटवडे येथील राजारामबापू संस्कृती भवनाजवळ पवार यांचे कौलारू घर आहे. शुक्रवारी (ता. १८) रात्री घरातील कामे आटोपून भारती पवार झोपल्या होत्या. मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पवार यांच्या घराशेजारी राहणारे प्रभू गणपते रात्रीच्या सुमारास बाहेर आले असता, त्यांना पवार यांच्या घरातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी आसपासच्या नागरिकांना तातडीने उठवून घटनेची माहिती दिली.

ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यानंतर ईश्वरपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. घराला एकच दरवाजा असल्याने तो उघडण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला; मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने त्यांना यश आले नाही. भारती पवार यांना घरातून बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

कासेगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अमोल माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा केला असून, आगीचे नेमके कारण व नुकसानीबाबत तपास सुरू आहे. शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले. भारती पवार यांच्या मागे दोन मुली आहेत. या आकस्मिक मृत्यूमुळे भाटवडे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मोठा अनर्थ टळला...

गॅस सिलिंडर असल्याने मोठ्या धोक्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ग्रामस्थ व अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखल्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट टळला. जर सिलिंडरचा स्फोट झाला असता, तर आजूबाजूच्या इतर घरांचेही अतोनात नुकसान झाले असते.

घरी होत्या एकट्याच

भारती पवार यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांच्या दोन्ही मुली विवाहित आहेत. घराला आग लागली, तेव्हा भारती पवार या घरी एकट्याच होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT