सांगली : घरफोडी, दुचाकी चोरी करणार्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. अटक केलेले सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून, कर्नाटकातील होस्पेट येथील आहेत. या टोळीकडून रोकड, दुचाकीसह 5 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणपती पेठ व विजयनगर येथील चोरीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आले. सुहेल ए. जे. लियाकत अली (वय 25, रा. राजाजीनगर, होस्पेट), एस. डी. इरफान अली एस दादापीर (21, रा. पुलबंद स्कूलजवळ होस्पेट), बी. के. मोहंमद तय्यब रेहमानवली (21, रा. बेल्लारी रोड सर्कलजवळ, उराम्मा बेलू, होस्पेट, जि. बेल्लारी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नियुक्त केले होते. या पथकातील पोलिस शिपाई विक्रम खोत यांना तानंग फाटा येथे तीनजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून सुहेल अली, इरफान अली दादापीर, बी. के मोहंमद रेहमानवली या तिघांना ताब्यात घेतले. तिघांकडे तपासणी केली असता, तय्यब याच्याकडे पाच लाख रुपयांची रोकड, लोखंडी कटावणी मिळून आली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी गणपती पेठेतील बंद दुकान फोडून रोकड चोरल्याची, तसेच विजयनगर चौकातून दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली. सर्वच संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कर्नाटकात दुचाकी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईत हवालदार महादेव नागणे, सागर लवटे, अनिल कोळेकर, दर्याप्पा बंडगर, सागर टिंगरे, संदीप गुरव, सतीश माने, मच्छिंद्र बर्डे, नागेश खरात, उदय माळी, संदीप नलावडे, सोमनाथ पतंगे, विक्रम खोत, कॅप्टन गुंडवाडे यांनी भाग घेतला. पकडलेल्या चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अधिकार्यांनी वर्तविली.