Crime News Pudhari Photo
सांगली

Sangli Crime : तळेवाडीत जुन्या वादातून घरावर हल्ला

चौघांना मारहाण करून दागिने व रोकड लांबवली; आटपाडी पोलिसांत १२ जणांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : तळेवाडी (ता. आटपाडी) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून घराचा दरवाजा मोडून आत प्रवेश करत कुटुंबातील सदस्यांना गज, काठ्या आणि चाकूने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार, ६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांचे आई-वडील आणि पत्नी, असे चौघे गंभीर जखमी झाले असून, संशयितांनी सोन्याचे दागिने व ४६ हजार रुपयांची रोकड लांबविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रणजित दादासाहेब शिंदे (वय ३५, रा. शिंदे वस्ती, तळेवाडी) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादाचा राग मनात धरून संशयितांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा मोडून आत बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादीसह त्यांच्या आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी, चाकू, काठी आणि लोखंडी गजाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. हल्ल्यादरम्यान संशयितांनी फिर्यादीच्या पत्नीच्या कानातील सोन्याचे टॉप्स, आईच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ आणि रोख ४६ हजार रुपये असा ऐवज जबरीने चोरून नेला.

याप्रकरणी भास्कर सीताराम शिंदे, दीपक सीताराम शिंदे, रमेश तुळशीराम शिंदे, रोहित रमेश शिंदे, विश्वास शहाजी शिंदे, पूजा भास्कर शिंदे, वैशाली दीपक शिंदे (सर्व रा. तळेवाडी) व इतर पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT