सांगली ः राज्यातील ज्या होमिओपॅथी डॉक्टरांनी फार्माकोलॉजी औषधशास्त्र या विषयात एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशा डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पंधरा जुलैपासून ही नोंदणी करता येणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले राज्यात सुमारे 20 हजार डॉक्टर्स आहेत. या सरकारच्या निर्णयाला आयएमएतर्फे जोरदार विरोध केला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी मंगळवारी (दि. 8) राज्यातील जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात येणार आहे. त्याशिवाय अकरा जुलैला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे. हा निर्णय रद्द न केल्यास 19 ला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्यात सुमारे 80 हजार होमिओपॅथीचे डॉक्टर्स आहेत. यातील बहुतेक डॉक्टर्स हे ग्रामीण आणि दुर्गम भागात व्यवसाय करतात. यापूर्वीच्या त्यांच्या अभ्यासक्रमात औषधशास्त्र हा विषय अभ्यासाला नव्हता. तरी सुद्धा अनेक होमिओपॅथीचे डॉक्टर्स अॅलोपॅथीचा व्यवसाय करतात. आता नवीन अभ्यासक्रमात त्यांना औषधशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र ज्या डॉक्टरांनी पूर्वी होमिओपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना औषधशास्त्राचे ज्ञान मिळावे, यासाठी फार्माकोलॉजी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये होणार आहे. 15 जुलैपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याला आयएमएतर्फे विरोध केला आहे. याविरोधात आयएमएची अगोदरच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचा निर्णय झालेला नाही. तरीसुद्धा राज्य शासनाने हा नवीन अध्यादेश काढल्याने आयएमए संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
एमबीबीएस झालेले डॉक्टर हे प्रशिक्षित व पुराव्यावर आधारित उपचार पद्धती शिकतात, तर होमिओपॅथी डॉक्टरांचे शिक्षण हे पूर्णत: होमिओपॅथीवर आधारित आहे. त्यांना आधुनिक औषधे, सर्जरी, आपत्कालीन वैद्यकीय व्यवसाय व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत नाही. त्यामुळे या नोंदणीला मान्यता देऊ नये, असे आयएमएचे मत आहे. अशा डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर म्हणून मान्यता दिली, तर रुग्ण गोंधळात पडतील. आपत्कालीन परिस्थितीत चुकीचा औषधोपचार, चुकीचे निदान यामुळे रुग्णाच्या जिवाला धोका होऊ शकतो, एमबीबीएस डॉक्टरांची प्रतिमा मलीन होईल, असे मत आयएमएकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आयएमएने याचा निषेध केला आहे.
होमिओपॅथी डॉक्टरांना मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीचा निर्णय हा चुकीचा आहे. हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. रुग्णांना योग्य ती आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे याविरोधात आयएमएतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.डॉ. रवींद्र मोहिते, अध्यक्ष आयएमए.
होमिओपॅथीचा सुद्धा साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम आहे. ग्रामीण व दुर्गम भागात हे डॉक्टर सेवा देतात. त्यामुळे राज्य शासनाचा निर्णय योग्यच आहे. कोरोना काळात सुद्धा या होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी चांगली आरोग्य सेवा रुग्णांना दिली होती.- डॉ. मनुवर मुजावर, अध्यक्ष, - डॉ. माधवी ठाणेकर, सचिव, होमिओपॅथी डॉक्टर संघटना.