जत शहर/शिराळा शहर : जत तालुक्याच्या पूर्व भागातील माडग्याळ, व्हसपेठ, सोन्याळ, उटगी आणि जाडरबोबलाद परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला. तसेच शिराळा तालुक्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळून नुकसान झाले.
जत तालुक्यातील पूर्व भागातील माडग्याळ येथील शाळेच्या मैदानातील मोठे वडाचे झाड वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. एका दुचाकीवर नारळाची झावळी पडून नुकसान झाले. माडग्याळ येथे काही ठिकाणी नव्याने लागवड केलेल्या डाळिंब बागांतील झाडे वाऱ्यामुळे आडवी पडली. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. व्हसपेठ येथील केराप्पा श्रीपती हुवाळे यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील सिमेंटचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. वाऱ्याने उडालेले पत्रे फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
शिराळा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा...
शिराळा : शिराळा व परिसरात बुधवारी सायंकाळी पावणे पाचनंतर पाऊण तास पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी अचानक परिस्थिती बदलली. रेड, खेड, कापरी, बेलदारवाडी, इंग्रुळ, भटवाडी, पाडळी, निगडी, वाकुर्डे, गिरजवडे या भागात गारांच्या पावसाने हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. पावसाने सायंकाळी सुखद गारवा दिला.
दरम्यान, शिराळा येथील ज्योतिर्लिंग पाटील यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर वीज कोसळून नुकसान झाले. झाडाने पेट घेतल्याने शिराळा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. काही वेळानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने अन्य कोणतेही नुकसान झाले नाही. पावसाने हातातोंडाला आलेल्या आंबा पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. निगडी परिसरात जनावरांची वैरण पाण्यात वाहून गेली. काही ठिकाणी रब्बीच्या काढणी मळणीची कामे चालू होती. तिथे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.