सांगली ः सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सुरू झालेला पाऊस शनिवारी दुपारपर्यंत सुरूच होता. त्यानंतर पावसाने थोडी उघडीप दिली. सांगली शहरासह मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांमधील वीस मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. सलग पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अग्रणी, माणगंगा, येरळा या नद्या, तसेच ओढे, नाले दुथडी वाहत होते. पावसाचे पाणी हजारो नागरिकांच्या घरांत घुसले. त्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. जिल्ह्यातील चाळीसहून अधिक रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्क तुटला.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. द्राक्षबागा, भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.शुक्रवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर पाऊस सुरू होता. पावसामुळे रस्त्यांवर सर्वत्र पाणी पाणी झाले होते. हवेत गारवा होता. रात्रभर पाऊस सुरूच राहिला. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत पावसाचा जोर सुरूच होता. सायंकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली होती.
दरम्यान, या पावसामुळे जिल्ह्यातील अग्रणी, येरळा, माणगंगा या नद्या, त्याशिवाय ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. हे पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिक व प्रशासनाची धावपळ उडाली होती. जिल्ह्यातील 40 हून अधिक रस्ते, पूल पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, काढणीला आलेल्या सोयाबीन, कडधान्य, भाजीपाला अशा पिकांना मोठा फटका बसलेला आहे. या पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. त्याशिवाय सध्या द्राक्ष छाटणीचा हंगाम सुरू आहे. त्याच्यावरही या पावसाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठपर्यंत 24 तासात पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे ः इस्लामपूर 27 , पलूस 47, तासगाव 70, सांगली 75, मिरज 68, शिराळा 20, आटपाडी 53, कवठेमहांकाळ 83, जत 42, कडेगाव 40, विटा 59.
सांगलीत आयर्विन पुलाजवळ शनिवारी सायंकाळी कृष्णा नदीची पाण्याची पातळी पंधरा फूट होती. कोयना धरणातून वीस हजार, तर चांदोली धरणातून पाच हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील इतर नद्या, ओढे, नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने सांगलीसह जिल्ह्यात रविवारी, तसेच सोमवारीही जोरदार पाऊस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे
पुढील दोन दिवसात जिल्ह्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल. घाबरण्याची अजिबात गरज नाही, परंतु सजग आणि सतर्क राहा. नदीकाठ, ओढे, नाल्यांजवळ अनावश्यक वावर टाळा. पुलावरून पाणी वाहत असल्यास कोणीही त्यातून आपले वाहन चालवू नये अथवा त्यातून चालतही जाऊ नये. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शेतकरी बांधवांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा आणि गावकर्यांनी एकमेकांना मदत करावी. आपली सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. आपण सर्वजण एकत्र राहून सावधगिरी बाळगली, तर कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. अडचणीच्या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कक्ष दूरध्वनी क्रमांक 0233-2600500 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.