सांगली : सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणात १०,११६ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून आतापर्यंत २.१७ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. गेल्या २४ तासांत धरण परिसरात ७२ मिमी, तर पाथरपुंज येथे १४९ मिमी पावसाची नोंद झाली.
शिराळा तालुक्यात वारणा व मोरणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून मांगले–सावर्डे येथील वारणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली गेला आहे.
तासगाव व कडेगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असून पेरणी, लागवड आणि मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, बहुतांश तलाव व विहिरींमध्ये अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नसल्याने शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
वारणेच्या पातळीत लक्षणीय वाढ
दुधगाव : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहते आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक पाणी उपलब्द झाले आहे. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.