सांगली ः जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्यानंतर मध्यरात्री पुन्हा दमदार पावसाने झोडपून काढले. पावसाचा जोर कायम राहिल्याने नद्या, तलाव, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांची दैना उडाली आहे. कृष्णेसह वारणा नदीवरील जिल्ह्यातील बंधारे मंगळवारी पाण्याखाली राहिले. दुष्काळी तालुक्यातही दमदार पाऊस होत असल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून सलग पाऊस सुरूच आहे. त्यातच हवामान विभागाने, बुधवारीही जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस सुरूच आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागास झोडपून काढल्यानंतर दुष्काळी भागातही जोरदार पाऊस पडतो आहे. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
ओढे आणि नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आटपाडी तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. या दमदार पावसामुळे शेती आणि शेतकर्यांचे मात्र नुकसान झाले आहे.
शिराळा तालुक्यात सलग आठ दिवस पाऊस सुरू आहे. तेथे पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी, अनेक ठिकाणी शिवारात पाणी साचून राहिल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे पाझर तलाव, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कृष्णेनंतर वारणा नदीवरील बंधारेही पाण्याखाली गेले. चिकुर्डे, निलेवाडी, शिगाव, समडोळी, दुधगाव बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पावसामुळे तासगाव तालुक्यातील चार आणि कडेगाव तालुक्यातील एक मार्ग बंद आहे. वासुंबे, मतकुणकी, कुमठे ते सांबरवाडी, राजापूर-शिरगाव मार्ग, बस्तवडे-गव्हाण शिरढोण रस्ता, तसेच कडेगाव तालुक्यातील ढवळेश्वर-कळंबी-भाळवणी-देवराष्ट्रे रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला आहे.
मिरज 13, जत 21.5, खानापूर 20.9, वाळवा 9.8, तासगाव 18.7, शिराळा 8.7, आटपाडी 38.1, कवठेमहांकाळ 15.6, पलूस 6.9 आणि कडेगाव तालुक्यात 8.5.