‘शक्तिपीठ’ मोजणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त Pudhari File Photo
सांगली

Sangli Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ मोजणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

८०० वर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात

पुढारी वृत्तसेवा

सांगली : राज्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त जमीन मोजणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २४) खानापूर तालुक्यातील माहुली आणि भाग्यनगर परिसरात पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्तात सुमारे ८०० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

मोजणीच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांकडून होणारा तीव्र विरोध लक्षात घेता, पोलिस प्रशासनाने आधीपासूनच खबरदारी घेतली होती. सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी शक्तिपीठ महामार्गविरोधी आंदोलनातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले होते. मंगळवारी सकाळी मोजणी पथक आणि उपविभागीय अधिकारी माहुली परिसरात दाखल होताच संपूर्ण परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. जिल्ह्यातून बोलावण्यात आलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि राखीव दलाच्या जवानांनी मोजणीच्या ठिकाणी सुरक्षा कवच उभारले होते.

मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नागेवाडी, माहुली आणि भाग्यनगर परिसरातील शेतकऱ्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून तब्बल आठ तास ठिय्या आंदोलन करत प्रशासनाची कोंडी केली. संतप्त शेतकऱ्यांनी मोजणीची यंत्रे ताब्यात घेऊन फोडून टाकल्याने परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी तैनात असलेल्या ८०० हून अधिक पोलिसांच्या फौजफाट्याने संयमाने परिस्थिती हाताळत कोणताही मोठा अनर्थ होऊ दिला नाही. अखेर शेतकऱ्यांचा वाढता दबाव आणि आक्रमक पवित्रा पाहता प्रांताधिकारी व प्रशासनाने मोजणी न करताच माघार घेण्याचा निर्णय घेतला, तर ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनाही सायंकाळी उशिरा सोडून देण्यात आले. दिवसभर तणावाच्या छायेत असलेल्या या परिसरातून मोजणी स्थगित झाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा माघारी परतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT