सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News : आरोग्य विभाग पुन्हा चर्चेत

फसवणुकीच्या प्रकरणाची झाडाझडती तातडीने घेण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. आठ दिवसांत दोन घटना समोर आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात कोणी अधिकारी, कर्मचारी सहभागी आहे का, याच्या सखोल तपासणीसाठी झाडाझडती घेण्याची मागणी होत आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेविका (महिला) या पदावर निवड झाल्याचे व आरग आरोग्य केंद्रात नियुक्ती झाल्याचे आदेश घेऊन एक महिला आठ दिवसांपूर्वी आरोग्य विभागात आली होती. त्यानंतर यंत्रणेत खळबळ उडाली. या आदेशाची खातरजमा झाल्यानंतर तो आदेश बोगस असल्याची माहिती समोर आली. मात्र गंभीर म्हणजे ज्याच्या मदतीने त्या महिलेला नियुक्तीपत्र मिळाले, ती व्यक्तीदेखील यावेळी उपस्थित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात थेट गुन्हा दाखल करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने केवळ अर्ज दिला. त्यामुळे या प्रकाराबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू होती.

ही घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला. आरोग्य विभागात कनिष्ठ सहायक आणि आरोग्य सेवक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आठ दिवसांत अशा दोन प्रकरणांमुळे आरोग्य विभाग पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकारांमागे प्रशासनातील कोणी सहभागी आहे का?, कोणते रॅकेट कार्यरत आहे का? याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT