- विवेक दाभोळे
सांगली : वारणा नदीत आरोग्याला धोकादायक रसायनांचा अंश असलेले पाणी मिसळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याकडे जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा सोयीस्कर डोळेझाक करत आहे. याची कोणीच गांभीर्याने दखल घेत नसल्याचे चित्र आहे.
वारणा नदीचे पाणी देखील आरोग्याच्यादृष्टीने घातक ठरू लागले आहे. मणदूरच्या डोहापासून ते खाली समडोळी बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रातील पाणी सतत हिरवे, काळपट होते. यासाठीच्या कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी दुर्गंधीही येते. लोक रस्त्यावर उतरले आणि सतत आंदोलनं केली, तरच चित्र बदलू शकते अन्यथा कठीण आहे.
उगम - पाथरपुंज (जि. सातारा) या चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम ठिकाणी
लांबी - चांदोली धरणापासून हरिपूरपर्यंत सुमारे १५८ किलोमीटर
लाभ- पाथरपुंज ते हरिपूर दुतर्फा शेतीक्षेत्र ओलिताखाली. पिण्याच्या पाण्यासाठी.
छापील उत्तरे देणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ - प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ दूषित पाण्याचे नमुने जमा करायचे, ते पुढे परीक्षणासाठी पाठवायचे, एवढेच काम करायचे, असेच या मंडळाने ‘अंगीकृत’ मानले आहे. तसेच नदीपात्रातील प्रदूषणाबद्दल काय कारवाई केली का? यासंदर्भात स्पष्टपणे माहिती दिली जात नाही. केवळ नमुने घेतले आहेत, तपासणी करत आहोत, अशीच छापील उत्तरे दिली जातात.
मासे कायमचे नष्ट होण्याची भीती
जीवघेण्या रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील मासे तडफडून मृत्युमुखी पडू लागले आहेत. या नदीत वाम, रोहू, कटला तसेच अन्य विविध स्थानिक प्रजातीचे मासे आढळतात. जलप्रदूषणामुळे प्राणवायुअभावी मासे वेगाने मृत्युमुखी पडू लागलेत. या माशांचा अक्षरश: वंशच्छेद होतोय की काय, अशी भीती आहे. दुर्मीळ जलसंपदा कायमची नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यांना पाहावे लागेल चित्रातच...
जलप्रदूषणामुळे वारणा नदीतील माशांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती खास करून रहू, कटला, वाम, मरळ, वैशवडा, वाम, शेेंगटा, कटारणे, किलार, पानस, वंजी, निलगीर या जाती कायमच्या नष्ट होण्याचा मोठा धोका आहे.