सांगली : हरिपूर ते सांगली रस्त्यावर डाव्या बाजूने चालत निघालेल्या महिलेस पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली. अपघातात संबंधित महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी अरविंद भगत असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्या कन्या डॉ. कुमारी सोनाली अरविंद भगत (वय २९, रा. मोर्या कॉलनी, हरिपूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीच्या (क्र. एमएच १० बीएन ८६८९) चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिपूर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर हा अपघात घडला. फिर्यादी डॉ. सोनाली आणि त्यांची आई लक्ष्मी भगत या रस्त्यावरून पायी जात असताना, संशयित अल्पवयीन दुचाकीस्वाराने भरधाव वेगात दुचाकी चालवून लक्ष्मी भगत यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेमुळे त्या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोळ्याजवळ आणि नाकावर गंभीर दुखापत झाली.