सांगली : सांगली-हरिपूर रस्ता गटारींच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र, या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान होत आहे.
या खोदकामादरम्यान अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या असून गेल्या दोन महिन्यांपासून लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. पाण्याची नासाडी होत आहे. एकीकडे सांगली महानगरपालिका नागरिकांना दिवसातून केवळ एक तास पिण्याचे पाणी पुरवते, तर दुसरीकडे हरिपूर रस्त्यावर दोन महिन्यांपासून 24 तास पाणी रस्त्यावरून वाहत आहे. महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. पाणी साचल्यामुळे रस्ता निसरडा झाला असून, वाहन धारकांना कसरत करावी लागत आहे.
लहान मुले, वृद्धांच्या जिवाशी खेळ
खोदलेल्या चरी, साचलेल्या पाण्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना पडल्यामुळे दुखापत होत असून, वृद्ध नागरिक या खड्ड्यात पडता पडता वाचले आहेत. एखाद्याचा बळी गेल्यानंतर महापालिकेला जाग येणार का? असा सवाल रहिवासी विचारत आहेत. रस्ताकाम करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. रस्ता दुरुस्त करावा व पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.