हरिपूर : हरिपुरातील नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या नावे असणार्या पाराची यथोचित डागडुजी केली जाईल, सुशोभीकरण केले जाईल, असे आश्वासन आमदार सुधीर गाडगीळ यांनी रविवारी येथे दिले.
वारणा-कृष्णा नद्यांच्या येथील संगमाकाठी असलेल्या पिंपळाच्या पारावर नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांना अजरामर ‘संगीत शारदा’ नाटकाचे कथाबीज सुचले. आज मात्र, ही जागा विस्मृतीच्या अंधारात हरवताना दिसत आहे. सध्या या पाराची दुरवस्था झाली आहे. पिंपळाभोवतीच्या कठड्याचे दगड सैल झाले आहेत. स्मृतिचिन्ह म्हणून लावलेला संगमरवरी फलक, एवढीच या ऐतिहासिक ठिकाणाची एकमेव खूण उरली आहे. यासंदर्भात ‘दैनिक पुढारी’ने रविवारी सचित्र वृत्तांत प्रसिद्ध केला होता. त्याची संवेदनशील रंगकर्मींनी दखल घेतली. तसेच काल संगीत दिनाचे औचित्य साधून नाट्यपदे, नाट्यप्रवेश सादर केले. हा कार्यक्रम संगमेश्वर मंदिराच्या मागे असणार्या सभागृहात झाला. येथील नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल स्मृतिप्रीत्यर्थ पारकट्ट्याचे सुशोभीकरण अनावरण सोहळा समिती व जायंट्स वेल्फेअर संघटना आयोजक होते.
या सोहळ्यास आमदार गाडगीळ, उद्योजक गिरीश चितळे, ज्येष्ठ नागरिक जोती बोंद्रे, हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर गोविंद बल्लाळ देवल यांची पणती शारदा आदी उपस्थित होत्या. सर्वांचे पगडी घालून स्वागत करण्यात आले. विशाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगल जोशी, शैला देशपांडे, रागिणी पटवर्धन, अर्चना बियाणी, वीणा चौगुले, अर्चना साळुंखे, स्वराली सांभारे, श्रुती बोकील, समिता सांभारे, मनीषा सांभारे, श्रध्दा दांडेकर, मंगेश सांभारे, केदार सांभारे, विनायक हसबनीस, राजू सुपेकर, सुप्रिया उकिडवे यांनी कष्ट घेतले.