कुपवाड : ओडिसातून मागविलेल्या 42 लाखांच्या गांजाप्रकरणी संशयित विजय ऊर्फ पप्पू बजरंग फाकडे (वय 44, रा. हरिपूर, ता. मिरज) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी अटक केलेला संशयित विकी विजय कांबळे (वय 32, रा. भीमनगर पिंपरी रोड, जाळोची ता. बारामती) याला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी दिली. मुख्य तस्कर संशयित चंदनसिंह व त्याच्या पत्नीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.
हरिपूर (ता. मिरज) येथील संशयित पप्पू फाकडे याला गांजा विक्री करण्यासाठी आलेला आंतरराज्य तस्कर विकी कांबळे याच्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कुपवाड पोलिसांनी पाठलाग करून मुसक्या आवळल्या. पोलिसांनी संशयित कांबळे याच्याकडील 42 लाख 63 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. पोलिसांनी शुक्रवारी हरिपूर येथील संशयित पप्पू फाकडे याला गांजाप्रकरणी अटक केली.
आंतरराज्य टोळीचा मुख्य गांजा तस्कर संशयित चंदनसिंह व त्याच्या पत्नीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. ओडिसामधील मुख्य तस्कर जॉकी याचे मोठे नेटवर्क कार्यरत आहे. सांगली पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने या प्रकरणाचे धागेदोरे दूरपर्यंत असण्याची आणि लवकरच अमली पदार्थ तस्करातील काही बडे मासे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.