सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका Pudhari
सांगली

Sangli News : ‌‘हॅम‌’ राबवणारच; खोडा हाणून पाडणार

महापौर, सभापतींचा इरादा : विरोधी पक्षनेत्यांना टीकेशिवाय दुसरा उद्योग नाही

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहरातील प्रमुख रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणे, शहराची कनेक्टिव्हिटी वाढवणे व त्यातून उद्योग-व्यवसाय वाढवून महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठीच ‌‘हॅम‌’ प्रोजेक्ट राबविणार आहोत. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय होईल. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांना टिका करण्याशिवाय दुसरा उद्योग नाही. शहराच्या विकासात खोडा घालण्याचा त्यांचा उद्योग हाणून पाडू, असा इरादा महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केला.

‌‘हॅम‌’च्या माध्यमातून रस्ते काँक्रिटीकरणाचा सत्ताधाऱ्यांचा घाट असल्याची टीका विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केली होती. या टिकेला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. महापौर सूर्यवंशी म्हणाले, जिल्हा न्यायालय - कुंभारमळा ते राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा रस्ता होणे अतिशय गरजेचे आहे. याशिवाय अन्य काही रस्ते ‌‘हॅम‌’च्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. कोणते रस्ते करायचे, यासंदर्भात पदाधिकारी व आयुक्त, अशी संयुक्त पाहणी केली आहे. अजून रस्ते निश्चित व्हायचे आहेत. त्यापूर्वीच विरोधी पक्षनेत्यांना 11 रस्त्यांचा दृष्टांत कोठून झाला, हे माहिती नाही.

सभापती माने म्हणाले, महापालिका सोलर प्रोजेक्ट राबविणार आहे. त्या माध्यमातून महापालिकेच्या वीज बिलावरील खर्चात दहा वर्षात 350 कोटींची बचत होणार आहे. हा निधी शहर विकासासाठी आवश्यक रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी वापरता येईल. महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही. ‌‘हॅम‌’च्या माध्यमातून वार्षिक केवळ 2 टक्के व्याजाने निधी उपलब्ध होणार आहे.

आवटी म्हणाले, महापालिका क्षेत्रात पायाभूत सेवा-सुविधा निर्माण करत आहोत. ‌‘हॅम‌’संदर्भात विरोधी पक्षनेत्यांचा गैरसमज झाला असावा. यावेळी समाजकल्याण सभापती गीता पवार, प्रभाग समिती सभापती वैशाली गवळी, अश्विनी कोळी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सूरज पवार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT