सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबर 2025 मध्ये 127 कोटी रुपये जीएसटी महसूल जमा झाला आहे. ऑक्टोबर 2024 च्या तुलनेत 11 कोटींनी जीएसटीत वाढ झाली आहे. वाढीचे हे प्रमाण 9.50 टक्के आहे. जीएसटी दरात कपात होऊनही महसुलात वाढ झाली आहे. विक्रीत वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सप्टेंबर 2025 या महिन्यात झालेल्या व्यवहारांवरील जीएसटी महसूल ऑक्टोबर 2025 मध्ये जमा झाला आहे. त्याची आकडेवारी समोर आली आहे. दि. 22 सप्टेंबर 2025 पासून वाहने, वाहनांचे सुटे भाग, स्टार्च, दुग्धजन्य पदार्थ, वह्या, कोरुगेटेड बॉक्स, औषधे, वैद्यकीय उपकरणे, बेकरी व इतर खाद्य पदार्थ यावरील दरात फार मोठी कपात सरकारने केली. त्याचा महसुलावर काय परिणाम होतो, याबाबत उत्सुकता होती. मात्र वर्षातील मोठे सण नवरात्र, दसरा, दिवाळी या काळात मोठी उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर 2025 मधील आकडेवारीनंतर हे स्पष्ट झाले आहे. जीएसटी दरात कपात होणार असल्याची घोषणा दि. 3 सप्टेंबरदरम्यान झाली होती. प्रत्यक्षात निर्णय दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी झाला. अनेक वस्तूंवर जीएसटी दरात मोठी कपात झाल्याने विक्री वाढल्याचे जमा महसुलाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
पूर्ण देशाचा ऑक्टोबर 2025 मध्ये जमा झालेला जीएसटी 1 लाख 95 हजार 936 कोटी रुपये आहे. ऑक्टोबर 2024 च्या 1 लाख 87 हजार 346 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत 4.6 टक्के जादा कर संकलन झाले आहे. महाराष्ट्राचा विचार करता ऑक्टोबर 2025 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 32 हजार 25 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजे ऑक्टोबर 2024 च्या 31 हजार 30 कोटी रुपये जमा महसुलाच्या तुलनेत 3 टक्केपर्यंत जादा कर संकलन या महिन्यात झाले आहे.