सांगली : सांगली जिल्ह्याचा फेब्रुवारी 2026 या एका महिन्याचा जीएसटी महसूल 103 कोटी रुपये झाला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये हा महसूल 110 कोटी रुपये होता. गतवर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत यावेळी महसूल 7 कोटींनी घटला आहे. त्यास प्रामुख्याने जीएसटी दरातील कपात हे कारण दिसत आहे.
सांगली जिल्ह्याचा गेल्या 11 महिन्यांचा जीएसटी महसूल 1396 कोटी रुपये झाला आहे. त्यामध्ये आठ टक्के वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 चा जीएसटी महसूल 1396 कोटी झाला आहे. आर्थिक वर्षाच्या म्हणजे एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 च्या 1295 कोटी रुपये महसुलापेक्षा आता जीएसटीत सुमारे 101 कोटींची म्हणजेच 8 टक्केपर्यंत वाढ झाली आहे. तर जिल्ह्यात केवळ फेब्रुवारी 2026 चा जीएसटी महसूल 103 कोटी रुपये झाला आहे. दि. 22 सप्टेंबर 2025 पासून वाहने, वाहनांचे सुटे भाग, स्टार्च, दुग्धजन्य पदार्थ, वह्या, कोरुगेटेड बॉक्स, औषधे, वैद्यकीय उपकरणे, बेकरी व इतर खाद्य पदार्थ, मिनरल वॉटर या वरील दरात फार मोठी कपात झाली होती. महसुलावर त्याचा काय काय परिणाम होतो, याची उत्सुकता होती. फेब्रुवारी 2026 मध्ये जीएसटी महसुलात घट झाली आहे.
देशात 1.61 कोटी करदाते असून एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 मध्ये जीएसटीचा एकूण महसूल 20 लाख 27 हजार 33 कोटी आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीतील 18 लाख 71 हजार 670 कोटी महसूल होता.
महसूल वृद्धीचे प्रयत्न सुरू.....
सांगली जिल्ह्याचा वर्षातील आतापर्यंतचा एकूण विचार करता मागील आर्थिक वर्षातील 1436 कोटी रुपयांच्या जीएसटी महसूल वसुलीनंतर आता जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या 11 महिन्यांत 31 हजारांवर करदात्यांकडून चांगला जीएसटी महसूल जमा झाला. जिल्ह्यात वाहनांचे सुटे भाग, स्टार्च, साखर, मोलॅसिस, इथेनॉल, सोने-चांदीचे दागिने, दुग्धजन्य पदार्थ, वाहने अशा वस्तू, तर बिल्डर्स, रस्ते, विद्युत व जलसिंचन ठेकेदार, शीत गृहे, कमिशन एजंट आदी सेवा पुरवठादारांचा सहभाग कर महसुलात दिसत आहे. 2025-26 आर्थिक वर्षाच्या अखेरीस राज्य व केंद्रीय जीएसटी विभागाच्या कर चुकवेगिरीविरोधी शाखा, अन्वेषण शाखा तसेच लेखापरीक्षण शाखा सक्रिय झाल्या आहेत. कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाईच्या माध्यमातून महसूल वृध्दीचे प्रयत्न सुरू आहेत.