कवठेमहांकाळ, पुढारी वृत्तसेवाः मिरज-पंढरपूर महामार्गावर कुची गावाच्या हद्दीत रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात द्राक्ष व मजुरांनी भरलेल्या टेम्पोला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून नऊ मजूर जखमी झाले आहेत. टेम्पो व द्राक्षांचे मिळून सुमारे ५.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ट्रकचालक अपघातानंतर वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहितीअशी की, मोदीनसाब आप्पाहुसैन सांबरेकर (वय ३१, रा. बेळगाव, कर्नाटक) हे आपल्या ताब्यातील टेम्पो (क्र. केए-२२-एए-४७७०) मधून द्राक्षे व मजूर घेऊन पंढरपूरहून बेळगावकडे जात होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास कुची गावाजवळील एसआर हॉटेलपासून १०० मीटर अंतरावर असताना भरधाव ट्रक (क्र. एचआर-६७-डी-०३७९) ने त्यांच्या टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की टेम्पोतील काही मजूर रस्त्यावर फेकले गेले. त्याच ट्रकने समोर असलेल्या टँकर (क्र. एमएच-०८-बीसी-९००९) ला देखील धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घटनास्थळी सोडून फरार झाला. या अपघातात भारती राजू कांबळे आणि रेखा त्रिपाटी कांबळे या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जखमींमध्ये कांचना पांडुरंग कांबळे, रूपा बाळकृष्ण माने, पार्वती नंदु कांबळे, मंगल लक्ष्मण बेरड, आप्पासाहेब महादेव वाघमारे, वनिता बाबासो माने, मंगल बजरंग आवळे, कबीर शंकर कांबळे आणि श्रेयांश बाळकृष्ण माने यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात टेम्पोचे अंदाजे १.५ लाख, द्राक्षांचे १ लाख तर अन्य वाहनांचे मिळून एकूण अंदाजे ५.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भापकर करीत आहेत.