तासगाव : तालुक्यातील मणेराजुरी, गव्हाण व सावर्डे येथील 20 वर द्राक्ष बागायतदारांची द्राक्ष दलालाने साठ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी तासगाव पोलिस ठाण्यात सहाजणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. फसवणुकीचा आकडा आणि फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तक्रार दाखल करण्यात आलेल्यात महेश शहाणे, अनिल शहाणे, राजू चौधरी, राजेश कुमार, सुरेंद्र शहाने (सर्व रा. पटणा, मोहु बिहार), व पपलू (रा. दिल्ली) या संशयित द्राक्ष दलालांचा समावेश आहे. तक्रारीत म्हटले आहे : संशयित द्राक्ष दलाल शेतकऱ्यांच्या ओळखीचे आहेत. ते दरवर्षी मणेराजुरी परिसरात द्राक्ष खरेदीसाठी येत असतात. सात फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत दलालांनी शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जाऊन द्राक्षांची पाहणी केली. द्राक्षे पसंत असल्याचे त्यांनी सांगितले. दर ठरविला. शेतकऱ्यांनी द्राक्षाची तोडणी केली. द्राक्ष माल या दलालांना दिला होता. त्यावेळी दलालांनी प्रत्येक वेळी कमी-जास्त प्रमाणात रोख रकमाही दिल्या, तर काही जणांना ‘उर्वरित रक्कम नंतर देतो’ असे सांगितले.
दि. 3 मार्च रोजी संशयितांनी शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेतील संपूर्ण माल त्यांच्याकडील ए. व्ही ट्रान्सपोर्ट सांगोला (जि. सोलापूर) यांच्याकडील चारचाकी वाहनात भरून नेला. या वेळी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रकमेची मागणी केली असता त्यांनी शेतकऱ्यांना दलाल राहत असलेल्या ‘मणेराजुरी येथील अमोल निरगुडे यांच्या खोलीवर रात्री दहा वाजल्यानंतर या व तुमच्या सर्व द्राक्ष मालाच्या रकमा घेऊन जा’, असे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष माल भरलेली वाहने सोडून दिली.
ठरलेल्या वेळेत शेतकरी द्राक्ष दलाल रहात असलेल्या ठिकाणी गेले असता सर्वजण गायब असल्याचे दिसून आले. त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे भ्रमणध्वनी बंद होते. संबंधितांचा परिसरात शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी तासगाव पोलिसात धाव घेतली.
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची नावे आणि कंसात रक्कम अशी ः रणजित भोसले (एक लाख वीस हजार), संजय भोसले (एक लाख पन्नास हजार), अरविंद भोसले (दोन लाख पन्नास हजार), नितीन जाधव (तीन लाख 85 हजार), रोहन शिंदे (दोन लाख), पोपट भोसले (एक लाख), वसंत लांडगे (एक लाख 50 हजार), नामदेव जमदाडे (एक लाख 60 हजार), दगडू माळी (सावर्डे), (दोन लाख 90 हजार), हणमंत भोसले (60 हजार), विजय भोसले (25 हजार), बाळासाहेब भोसले (एक लाख), धनाजी पवार (एक लाख 50 हजार), साहेबराव चव्हाण (50 हजार), संदीप पाटील (20 हजार), संतोष भोसले (दोन लाख 65 हजार), पतंगराव शिंदे (5 लाख 5 हजार), सुधीर शिंदे (97 हजार), हरिच्चंद्र शिंदे (70 हजार), रावसाहेब साळुंखे (75 हजार), बाबासाहेब साळुंखे (70 हजार).