सांगली : अफगाणिस्तानमार्गे चीनच्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची होणारी आयात थांबवा, परदेशातून भारतात येणाऱ्या बेदाण्यावर, फळांवर आयात कराची आकारणी करा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बेदाणा व द्राक्ष उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी दिला.
बेदाण्याची आवक थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी बेदाणा व द्राक्ष उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आंदोलनामध्ये खासदार विशाल पाटील, पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हा सचिव तुकाराम माळी आदी सहभागी झाले होते.दत्ताजीराव पाटील म्हणाले, भारताला अजूनही निर्यात क्षेत्रात खूप मोठा वाव आहे. किमान साडेपाच लाख टन बेदाणा निर्यात होऊ शकतो. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देऊन बेदाणा उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणा मोठ्या प्रमाणात भारतात आणला जात अहे. चीनचा निकृष्ट दर्जाचा बेदाणा आयात कर चुकवून अफगाणिस्तानमार्गे सांगलीत आणला जात आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून त्यामुळे देशाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. आयात केलेल्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यावर प्रक्रिया करून, तो आपल्याकडील चांगल्या दर्जाच्या बेदाण्यामध्ये मिसळून विक्री केली जात आहे. सांगलीच्या बेदाण्यास ‘जीआय’ मानांकन मिळाले असल्याने त्या नावाखाली आरोग्यास घातक असणाऱ्या बेदाण्याची विक्री केली जात आहे. ऐन हंगामात होत असलेल्या आयातीमुळे देशातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्याचे दर घसरले आहेत. त्याचा फटका देशातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. याप्रकरणी व्यापारी, कंपनीवर केंद्र शासनामार्फत कडक कारवाई करण्यात यावी.
मोर्चाची सुरुवात विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. आंदोलनामध्ये मोहन पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलकांच्या मागण्या...
आयात केलेला निकृष्ट बेदाणा जप्त करावा
आयात बेदाण्याचा बेस रेट ठरवून त्यावर 100 टक्के आयात शुल्क आकारावे
परदेशातून आयात होणाऱ्या द्राक्षांसह, सफरचंद, केळी आदी सर्व फळांवर 100 टक्के आयात शुल्क आकारावे.
द्राक्षे व बेदाणा निर्यातीपासून परकीय चलन मिळत असल्याने सांगली जिल्ह्यात आयसीडी पोर्ट उभारावे.
शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा
संसदेत प्रश्न मांडणार : विशाल पाटील
अफगाणिस्तानमार्गे निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची होणारी आयात थांबवण्याची मागणी संसदेत करू, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी आंदोलकांना दिली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अफगाणिस्तानमार्गे येणाऱ्या चिनी बेदाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रश्नी आपण सरकारला जाब विचारू व हा प्रश्न तडीस नेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.