मिरज : नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला मोटारीची पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात जत तालुक्यातील कोसारीचे ग्रामसेवक महेश मनोहर भमाणे (वय 55, रा. धावडवाडी, ता. जत) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारीचा चेंदामेंदा झाला.
महेश भमाणे हे कोसारी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. शासकीय कामानिमित्त ते मोटारीतून मिरजेकडे जात होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांची मोटार तानंग फाटा परिसरात आली असता त्यांचा ताबा सुटला. त्यामुळे मोटार थेट महामार्गावरील लेन क्रमांक 1 वरून तीन लेन ओलांडून रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकली.
धडक इतकी जोरात होती की, मोटार कंटेनरच्या खाली घुसली. या अपघाताचा सर्व थरार महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.