शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या मेसमध्ये जेवणात किडे, अळ्या AI-generated photo
सांगली

Sangli News : शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या मेसमध्ये जेवणात किडे, अळ्या

विद्यार्थिनींची तक्रार; प्राचार्यांकडून तत्काळ ठेका रद्द

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या मेसमध्ये विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे व अपुरे जेवण दिले जात असल्याची गंभीर तक्रार विद्यार्थिनींनी केली आहे. वरण, भात आणि भाजीमध्ये किडे व अळ्या सापडत असल्याचा आरोप करत विद्यार्थिनींनी प्राचार्यांना निवेदन दिले आहे. मेसमधील स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत असल्याचे तसेच मेसचालक उद्धट वागत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

याबाबत महिला तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनींनी प्राचार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मेसमध्ये जेवणाची गुणवत्ता समाधानकारक नसून, जेवणामध्ये अनेकदा किडे व अळ्या आढळतात. भात कच्चा असतो, तसेच चपाती आणि भाजीचे प्रमाणही कमी असते. जेवण वेळेवर मिळत नाही. मेसमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मेसच्या परिसरात तसेच जेवण तयार करण्याच्या ठिकाणी योग्य स्वच्छता राखली जात नसल्याने अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जेवणातून दुर्गंधी येत असल्याचेही विद्यार्थिनींनी तक्रारीत म्हटले आहे.

याशिवाय मेसमध्ये शिळे अथवा उरलेले अन्न विद्यार्थिनींना दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेसमध्ये काम करणारे काही कर्मचारी कामाच्या ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करीत असल्याचेही विद्यार्थिनींनी तक्रारीत नमूद केले आहे. काही कर्मचारी विद्यार्थिनींशी उद्धटपणे वागत असल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.

सतत तक्रारी...

दरम्यान याबाबत प्राचार्य डॉ. संदीप पाटील म्हणाले, संबंधित ठेकेदाराच्या जेवणाबद्दल सातत्याने विद्यार्थिनीमधून तक्रारी येत होत्या. यानंतर महाविद्यालयाच्यावतीने ठेकेदाराला जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी ८ दिवसांची मुदत दिली होती. मात्र ठेकेदाराने काहीही बदल न केल्याने त्याचा ठेका रद्द करून नवीन मेस सुरू करण्यात आलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT