सांगली : राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्ष्ाकेतर कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी, तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी यासंदर्भात लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे अश्वासन दिले.
सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जाहीर करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी सेवा बंद करावी आदी मागण्यांसाठी हा संप सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय, प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयामधील 80 टक्के कर्मचारी गैरहजर आहेत. दुपारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यामध्ये सांगली जिल्हा संघटनेचे पुणे विभागीय सचिव पी. एन. काळे, संघटनेचे ज्येष्ठ नेते डी. जी. मुलाणी, जे. के. महाडिक, सुलताना जमादार, प्रतिभा हेटकाळे, शोभा मोहिते, विजय तोडकर, महेश मोहिते सहभागी झाले होते.
यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून निवेदन दिले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे, ते संघटनेशी चर्चा करत असून, संपावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.