कुरळप : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील सरकारी कंत्राटदाराने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. हर्षल अशोक पाटील (वय 39) असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. या आत्महत्येची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, हर्षल यांचे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे दीड कोटी रुपये शासनाकडे अडकल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हर्षल पाटील हे मंगळवारी सायंकाळी कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले होते . हर्षल हे रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत. घरच्यांनी त्यांची मित्र, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र ते सापडले नाहीत. बुधवारी दुपारी तांदूळवाडी हद्दीतील मानसिंग पाटील यांच्या शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे अवस्थेत हर्षल पाटील यांचा मृतदेह आढळला. एका युवा अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच खळबळ उडाली.
हर्षल पाटील यांनी जलजीवन मिशन योजनेचे काम घेतले होते. त्यांच्या कामाचे 1 कोटी 40 लाख रुपये अडकले होते. गेल्या वर्षापासून बिले थकल्याने हर्षल आर्थिक अडचणीत आले होते. शासनाकडून केलेल्या कामाचा मोबदलाच वेळेत मिळत नसल्याने ते नैराश्यात होते. त्यांचे शासनाकडे सुमारे 1.40 कोटींचे देयके प्रलंबित आहेत. सावकार व इतर लोकांकडून त्याने सुमारे 65 लाखांचे कर्ज घेतले होते. हर्षल हे त्यांच्या मित्रांना ‘मी आत्महत्या करतो, हे शासन पैसे देत नाही, इतर लोक मला पैशासाठी तगादा लावत आहेत. वडिलांना काय सांगू नका’, असे बोलत असल्याची चर्चा होती. सततच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक पाच वर्षांची मुलगी, दोन लहान भाऊ व आई, वडील असा परिवार आहे.
हर्षल याची आत्महत्या ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. त्यांच्या परिवारास शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. त्यांची प्रलंबित देयके द्यावीत. त्यांच्या नावे असलेले कंत्राटदार म्हणून असलेले शासकीय नोंदणीकरण त्यांच्या पत्नीच्या नावे वर्ग करावे लागेल. शासनाने कंत्राटदारांची सर्व विभागाकडील देयके तातडीने देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा नवयुवक, उद्योजक, कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकतील. शासनास याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणीपुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोरे, महासचिव सुनील नागराळे, पदाधिकार्यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे.
हर्षल पाटील या कंत्राटदारानं आत्महत्या केलीय. राज्यातल्या कंत्राटदारांचे जवळपास 80 ते 90 हजार कोटी रुपये थकलेत.वैभवशाली महाराष्ट्र भाजप-महायुती सरकारने कंगाल करून ठेवला आहे. आता अजून किती हर्षल बघायचेत माहिती नाही. हर्षल याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी राज्यशासनाने घ्यावी , तसेच शासनावर गुन्हा नोंदवण्यात यावा. शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने राज्यसरकारचा जाहीर निषेध आणि यावर लवकरात लवकर मार्ग निघाला नाही तर तीव्र आंदोलन करणार.अभिजीत पाटील, जिल्हाप्रमुख,सांगली.