सांगली : येथील कुंभारमळा परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे ताजे असतानाच, आता जवळच असलेल्या गव्हर्न्मेंट कॉलनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कोल्ह्याचा वावर दिसून आला आहे. परिसरातील नागरिकांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे पथक दाखल झाले. तोवर कोल्ह्याने धूम ठोकली होती. दरम्यान, सकाळी उष:काल हॉस्पिटल रोड परिसरातही काही नागरिकांना कोल्हा निदर्शनास आला. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
गव्हर्न्मेंट कॉलनी परिसराच्या दक्षिण बाजूला कुंभार मळा परिसरात नुकत्याच दिसलेल्या ठशावरून बिबट्याचा वावर निदर्शनास आला होता. दोन दिवसांपूर्वी शंभरफुटी परिसरातील डी-मार्टच्या मागील बाजूस कोल्हा दिसून आला. त्याची वन विभागाने सुटका करीत त्याच्या अधिवासात मुक्त केले. त्यानंतर गुरुवारी सकाळी गव्हर्न्मेंट कॉलनीतील माऊली हॉटेलसमोरील एका सदनिकेच्या पार्किंगमध्ये कोल्हा दिसून आला. परिसरातील कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर तो पळत सुटला. तेथून तो दक्षिण बाजूला पळाला. तेथील एका सदनिकेत तो घुसला. त्यावेळी खेळणाऱ्या एका मुलाने त्याला पाहिले आणि आरडाओरड केली. तेथून कोल्ह्याने धूम ठोकली. हे सारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाले आहे.
माजी नगरसेवक युवराज गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे सचिन साळुंखे यांच्यासह पथकाने धाव घेतली. तोवर कोल्ह्याने धूम ठोकली होती. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास गव्हर्न्मेंट कॉलनीतील महालक्ष्मी चौकानजीक असलेल्या झुडपांच्या परिसरात काही नागरिकांना कोल्हा दिसला.