सांगली

Sangli News: स्वातंत्र्यानंतर गोरड वस्तीला पहिल्यांदाच मिळाले नळाचे पाणी

पाण्यासाठीची वर्षानुवर्षांची भटकंती थांबली; गोरड वस्तीतील नागरिकांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : स्वातंत्र्यानंतर तब्बल अनेक दशकांनी आटपाडी शहरालगतच्या गोरड वस्तीच्या अंगणात अखेर नळाचे शुद्ध पाणी पोहोचले आहे. पाण्यासाठी दररोजची पायपीट, टँकरची प्रतीक्षा आणि उन्हाळ्यातील तीव्र हालअपेष्टा सहन करणाऱ्या गोरड वस्तीतील नागरिकांना आता स्वतःच्या घरासमोर नळातून वाहणारे पाणी पाहण्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. या क्षणाने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

आटपाडी नगरपंचायतीच्या पुढाकारातून गोरडवस्ती येथे प्रथमच नळपाणी पुरवठा योजना प्रत्यक्षात आली असून घरा-घरांत शुद्ध पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वी ग्रामपंचायत हद्दीत, सध्या नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ट झालेली ही धनगर समाजबहुल वस्ती सुमारे 14 ते 16 घरांची आहे. काही कुटुंबे आजही पारंपरिक मेंढपाळ व्यवसायावर उदरनिर्वाह करतात, तर काहीजण मजुरी व इतर कामांमधून संसार चालवतात. मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा येथील नागरिकांच्या आयुष्यातील कायमचा संघर्ष बनला होता. उन्हाळ्यात महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी लांब अंतर चालत जावे लागायचे. पाण्याच्या एका घागरीसाठी तास न्‌‍ तास प्रतीक्षा करावी लागे. अनेकदा मुलांनाही पाणी आणण्यासाठी शिक्षण बाजूला ठेवावे लागायचे.

या वेदना आणि संघर्षाची दखल घेत नगरपंचायतीच्या माध्यमातून गोरड वस्तीसाठी नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. गोरडवस्ती येथील बाळुमामा मंदिर परिसरात पूजन करून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्यांदाच घरासमोर नळातून वाहणारे पाणी पाहताना नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता. ‌‘आता आमच्या लेकरांना पाण्यासाठी भटकावे लागणार नाही,‌’ अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली.

यावेळी नगराध्यक्ष उत्तम जाधव, मुख्याधिकारी वैभव हजारे, गटनेते ऋषिकेश देशमुख, पाणीपुरवठा सभापती डॉ. जयंत पाटील, नगरसेवक महेश देशमुख, नगरसेवक आबासाहेब नांगरे-पाटील, युवा नेते चंद्रकांत काळे, उत्तम गोरड, बाळासाहेब मेटकरी, दादा कोळेकर, दादा गोरड, प्रवीण खांडेकर, आप्पा गोरड, नारायण पुजारी, शिवाजी नांगरे उपस्थित होते. गोरड वस्तीतील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विकास कामांचा वेग कायम ठेवला जाणार असून, या नळपाणी योजनेमुळे वस्तीच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT