Theft Pudhari
सांगली

Sangli Temple Theft: गोमेवाडीच्या गणपती मंदिरातील चांदीच्या अलंकारांवर डल्ला

साडेतीन किलो चांदीचे मखर व झुंबर लंपास

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : गोमेवाडी (ता. आटपाडी) येथील ग्रामदैवत श्री गणपती मंदिराचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे साडेतीन किलो वजनाचे चांदीचे अलंकार लंपास केले. या प्रकरणी संतोष सूर्यकांत देशमुख (वय ५०, रा. गोमेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना २९ जून ते ९ जुलै दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमेवाडीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणपती मंदिरासाठी सुमारे वीस वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून चांदीचे अलंकार अर्पण केले होते. मंदिरातील चांदीचे अलंकार जागेवर दिसत नसल्याची माहिती फोनवरून मिळाल्यानंतर फिर्यादी संतोष देशमुख यांनी मंदिरात धाव घेतली. त्यावेळी मंदिराच्या बाहेरील शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले.

मंदिराची पाहणी केली असता, गणपती मूर्तीसमोरील लाकडी कमानीवर बसवलेला सुमारे अडीच किलो वजनाचा चांदीचा मखर आणि मूर्तीच्या डोक्यावरील सुमारे एक किलो वजनाचे चांदीचे झुंबर चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी एकूण साडेतीन किलो चांदीचा ऐवज पळवला आहे.

घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT