पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण बाजारपेठ सज्ज 
सांगली

Sangli News| पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण बाजारपेठ सज्ज

सोने १,९३,१२५, तर चांदी १,४८,२१७; दर पुन्हा पूर्वपदावर

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दिवाळी पाडव्याच्या (बलिप्रतिपदा) शुभमुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी सांगलीची सराफ बाजारपेठ पूर्णपणे सज्ज झाली आहे. गेल्या पंधरवड्यात काहीसे उतरलेले सोन्या-चांदीचे दर पुन्हा पूर्वपदावर आले आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या खास दिवशी सोने-चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जात असल्याने यंदाच्या पाडव्यावर लग्नराईच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी २४ ऑक्टोबर रोजी सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर (जीएसटीसह) १ लाख ४६ हजार १५७ रुपये, तर चांदीचा दर २ लाख ३ हजार ४२५ रुपये होता. त्यानंतर दरामध्ये काहीशी घसरण होऊन सोन्यात दहा हजार तर चांदीत पंधरा हजारांची घट झाली होती. मात्र, मागील चार दिवसांपासून दरात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सोमवारी सोन्याचा दर (जीएसटीसह) १ लाख ९३ हजार १२५ रुपये, तर चांदीचा दर १ लाख ४८ हजार २१७ रुपये नोंदवला गेला.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील ज्वेलर्सनी दागिन्यांच्या घडणावळीवर (मेकिंग चार्जेस) विशेष सवलत, एक्सचेंज बोनस आणि मोफत विमा यांसारख्या आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. तसेच, सणानिमित्त किंवा भेटवस्तू म्हणून देण्यासाठी देवदेवतांची चित्रे असलेल्या सोन्या-चांदीच्या नाण्यांना (कॉइन्स) बाजारपेठेत विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT