कडेगाव शहर : कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथे लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून एका 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. करिष्मा अमोल तुपे (रा. तोंडोली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कडेगाव पोलिसांनी संशयित सचिन आबासाहेब तवर (वय 21, रा. बेलवडे, ता. कडेगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही घटना मंगळवार, दि. 8 जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवार, दि. 11 जुलैरोजी नोंद करण्यात आली आहे. याबाबत फिर्याद करिष्माचे वडील अमोल केशव तुपे (वय 41, रा. तोंडोली) यांनी फिर्याद दिली आहे. कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडोली येथील रहिवासी असलेली करिष्मा कडेगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तर बेलवडे (ता. कडेगाव) येथील संशयित सचिन तवर हा ऑटो गॅरेजमध्ये काम करतो. सुमारे दीड ते दोन वर्षांपासून करिष्मा आणि सचिन यांचे प्रेमसंबंध होते. दोघांनीही एकमेकांना लग्न करण्याचा विश्वास दिला होता. गेल्या काही दिवसांपासून करिष्मा त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा करत होती.
परंतु, 8 जुलैरोजी सचिन तवर याने ऐनवेळी करिष्माला लग्नास नकार दिला. याच कारणाने करिष्माने आपल्या राहत्या घरी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कडेगाव पोलिसांनी तातडीने संशयित सचिन तवर याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे तोंडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कडेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.