पलूस : प्रेमासाठी वारंवार कॉल व मेसेज करून छळ केल्यामुळे १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सावंतपूर (ता. पलूस) येथे २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ऋतुजा मारुती हलस्कर असे मृत तरुणीचे नाव आहे. अंकुर बबन सुतार (रा. सावंतपूर, ता. पलूस) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक केलेली नाही.
मृत तरुणीचा भाऊ दिनेश मारुती हलस्कर (वय २४, रा. समर्थ कॉलनी, सावंतपूर) यांनी पलूस पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा कुटुंबीयांसमवेत सावंतपूर येथील समर्थ कॉलनीत राहत होती. १२ ऑगस्ट २०२६ ते २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपी अंकुर हा ऋतुजाला मोबाईलवरून वारंवार कॉल तसेच मेसेज करत होता. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर,’ अशाप्रकारे बोलून तो तिच्यावर दबाव आणत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सुमारे १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे ऋतुजाला मानसिक त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पलूस पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी २८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.
तासगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण अवचर, सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची कार्यवाही सुरू केली. घटनेशी संबंधित कॉल, मेसेज तसेच अन्य बाबींच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपासातून आत्महत्येपूर्वी नेमक्या कोणत्या प्रकारे मानसिक त्रास देण्यात आला होता, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
मोबाईल डेटा, कॉल डीटेल्सवरून तपास सुरू
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील करीत आहेत. पोलिसांनी मृत तरुणीचा मोबाईल ताब्यात घेतला असून, त्यातील कॉल रेकॉर्ड, व्हॉट्स ॲप चॅट आणि मेसेजची फॉरेन्सिक व तांत्रिक तपासणी केली जात आहे. संशयित अंकुर सुतार पोलिसांच्या हाती लागलेला नसून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तरुणीच्या आत्महत्येने सावंतपूर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.