सर्वसाधारण सभा बनल्या वादाचे आखाडे Pudhari File Photo
सांगली

Sangli : सर्वसाधारण सभा बनल्या वादाचे आखाडे

कुरळपमधील सभासद वैतागले ः मूळ प्रश्नांना बगल ः राजकारण, गटबाजीमुळे अनेक आव्हाने

पुढारी वृत्तसेवा

संदीप परीट

कुरळप : गावाच्या, संस्थांच्या, सभासद, शेतकर्‍यांच्या विकासासाठी सर्वसाधारण सभांचे आयोजन करण्यात येते. सभेच्या अजेंड्यावर विकासकामे, सभासदांच्या अडचणी आणि पारदर्शक कारभार यावर चर्चा व्हावी, निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा असते. परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणच्या सभा या वादविवाद, हाणामारीचे आखाडे बनले आहेत. त्यामुळे सभांचा गावकर्‍यांना आता कंटाळा आला आहे.

सभेची सुरुवात साधेपणाने होते, पण एखादा प्रश्न मांडला की, त्वरित आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी, टोलेबाजी सुरू होते. सत्ताधारी गटावर आर्थिक गैरव्यवहार, कामातील ढिसाळपणा, निर्णय प्रक्रियेतील गुप्तता, सभासदांना सन्मानाची वागणूक न मिळणे, संस्थास्तरावर नेत्यांचे हित जपले जाणे, असे आरोप सुरू होतात आणि वातावरण तापते. त्यावर उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर वैयक्तिक टीका करतात. मग वादाला सुरुवात होते. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांचा बळी जातो.

काही अपवाद वगळता बहुसंख्य सभा विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापेक्षा बगल देऊन संपवण्याकडे कल असल्याचे पाहायला मिळते. विरोधकांनी केलेल्या तक्रारी, आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा बर्‍याचवेळा सत्ताधारी करतात. त्यामुळे सभास्थळ रणांगणात बदलते. सभासदांची दिशाभूल होत आहे, लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, ही वस्तुस्थिती कुणीही नाकारू शकत नाही. संस्था व त्याअनुषंगाने मूलभूत सुविधा, शेतकर्‍यांचे प्रश्न, पाणीपुरवठा, आर्थिक उलाढाल, पारदर्शक कारभार यावर ठोस धोरण व्हावे, अशी अपेक्षा आहे. पण प्रत्यक्षात चर्चा होत आहे ती केवळ राजकारण, गटबाजी आणि एकमेकांना नामोहरम करण्याच्या स्पर्धेवर.

अनेकदा सभा तासन् तास चालतात. पण शेवटी निष्कर्ष शून्य! वादावादी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, हाणामारी, शिव्या यामुळे सभासद व सर्वसामान्य गावकरी निराश होतात. अशा सभा गावाच्या विकासाऐवजी राजकीय कुरघोड्यांचे केंद्र बनत आहेत, अशी नाराजी गावकर्‍यांतून व्यक्त होत आहे. खरे तर गावातील सूज्ञ नागरिकांचे मत आहे की, सभांचा उद्देश विसरला जाऊ नये. जबाबदारी आणि संवादाची संस्कृती रुजवली पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT