तासगाव : गौरगाव (ता. तासगाव) येथील यात्रेत दोन गावांच्या तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात चौघे जखमी झाले. याप्रकरणी सहा जणांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक कदम (रा. गौरगाव) व प्रणव शहाजी चव्हाण (रा. बस्तवडे) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.हाणामारीत प्रथमेश खराडे, कार्तिक राजेंद्र शिंदे, प्रणव चव्हाण व अशोक कदम हे जखमी झाले आहेत, तर विनोद शहाजी चव्हाण, प्रदीप शिंदे, वैभव शिंदे, किरण कदम, पार्थ पळसकर, विनोद शहाजी चव्हाण व कार्तिक राजेंद्र शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, बुधवारी गौरगाव येथे श्री यल्लमा देवीची यात्रा होती. दरम्यान सायंकाळी सात वाजता बस्तवडे व गौरगाव येथील दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यातून बस्तवडे येथील तरुणाने गावी जाऊन सहकारी मित्रांना माहिती दिली. त्यामुळे बस्तवडे येथील तरुणाचे टोळके रात्री गौरगाव येथे आक्रमक होऊन आले. त्यांनी यात्रेसाठी आलेल्या मिठाई, खेळणी, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्रास देऊन त्यांचे साहित्य विस्कटून टाकायला सुरुवात केली. त्यावेळी पुढे आलेल्या अशोक कदम यांना तरुणांनी काठीने मारहाण केली. अशोक कदम यांना परगावाहून आलेले तरुण मारहाण करीत असल्याचे पाहून गौरगाव येथील तरुणाचा एक गट आक्रमक झाला. त्यातून दोन गटात हाणामारी सुरू झाली.
याप्रकरणी जखमी अशोक कदम (रा. गौरगाव) यांनी, विनोद शहाजी चव्हाण, कार्तिक राजेंद्र शिंदे (रा. बस्तवडे) यांच्यासह अन्य, तर प्रणव शहाजी चव्हाण (रा. बस्तवडे) यांनी, प्रदीप शिंदे, वैभव शिंदे, किरण कदम, पार्थ पळसकर व अन्य काहीजणांविरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या हाणामारीदरम्यान यात्रेसाठी आलेल्या विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिक तपास तासगाव पोलिस करीत आहेत.