नंदू गुरव
सांगली : बाराशे विद्यार्थी आहेत साहेब होस्टेलला... शिवाय कामगार आहेत, निवासी शिक्षक आहेत ते वेगळे. रोज पंधराशे चपात्या लागतात. 28 बायका आहेत मेसमध्ये कामाला. त्यांना काय कामं द्यायची सांगा. तीन-चार दिवस झालं, गॅसच मिळत नाही. जीव रडकुंडीला आलाय नुसता. पोरांसाठी आम्ही काहीही करू, ते सोडा, पण सरकारनं जरा तरी काळजी घेतली पायजे का नको? आता सरकारनंच यासाठी काही तरी मार्ग काढायला पाहिजे.
शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील माई मेसमध्ये धडाडा चुली पेटल्या होत्या. आयाबायांनी चुलीवरच तवा ठेवून चपात्या करायला सरुवात केली होती. दुपारी मुलं भुक्यावून जेवायला येणार, त्यांना गॅस महागलाय, मिळत नाही हे सांगून काय उपयोग? संचालक गौतम पाटील यांनी मग जळणाची सोय केली आणि चुली पेटल्या. गॅसच मिळत नसल्यानं मेस अडचणीत आली असली तरी, ती जाणवू न देता तात्पुरती चूल पेटती ठेवण्यात आली आहे. हीच अवस्था जैन बोर्डिंगचीही आहे. जैन बोर्डिंगमध्ये सध्या 80 मुलं आहेत. त्यांचं रोज सकाळ संध्याकाळचं जेवण करायचं, तर महिन्याला 50 सिलिंडर्स लागतात. आज फक्त तीन सिलिंडर्स शिल्लक आहेत आणि गॅसची नोंदणीच होत नाही. ही सिलिंडर संपल्यानंतर मुलांच्या जेवणाचं काय करायचं, असा सवाल बोर्डिंगसमोर उभा आहे.
पंचशीलनगरमध्ये अरुणकुमार जाधव मेस चालवतात. साठ मुलं त्यांच्या मेसमध्ये जेवण करून सांगलीतील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. गॅसच्या तुटवड्यामुळे जाधव कुटुंबही काळजीत पडले आहे. शासनाने गॅस नोंदणी करायची मुदत पूर्वीइतकीच करावी, ती लांबवू नये, अशी मागणी त्यांनी केली. सांगली शहरात पोळी-भाजी केंद्र चालवणाऱ्या अजय मन्नूर यांनी मात्र, जरा कळ सोसायला पायजे असं सांगितलं. महापूर, कोरोना काळातही अशीच काहीशी परिस्थिती होती. मग हे तर युध्द आहे. जरा तुटवडा जाणवणारच. मोठी हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत, पण अगोदर घरातली चूल पेटली पाहिजे, असं सरकारचं धोरण आहे.
जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातील विविध मुलखांमधून मुलं जैन बोर्डिंगमध्ये थांबून शिक्षण घेत आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळं त्यांच्या जेवणाचा सवाल आता गंभीर होतो आहे. शासनाने मेस, विद्यार्थी वसतिगृह यांना विशेष बाब म्हणून गॅस पुरवठा केला पाहिजे.ॲड. मदन पाटील, अध्यक्ष, दिगंबर जैन बोर्डिंग, सांगली.
घरगुती गॅसला काही अडचण वाटत नाही. युध्दजन्य परिस्थितीत या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. अजून म्हणावी तशी झळ वाटत नाही. मासिक मेंबरशिपवाल्यांना अडचण आहे. पोळी-भाजी केंद्रांवर काही रोजचे नियमित गिऱ्हाईक नसते. त्यामुळे जादा ताण नाही.- अजय मन्नूर, पोळी-भाजी केंद्र संचालक, सांगली.