सांगली : सांगलीतील गणपती मंदिरात सोमवारी पूजा करताना अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन.  Pudhari
सांगली

Sangli Ganpati Temple Dispute : गणपती मंदिरातील पूजेच्या मानपानावरून वाद

मुलगी अभिनेत्री भाग्यश्री यांनी परस्पर पूजा केल्याने विजयसिंहराजेंचा संताप

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थानच्या मंदिरात गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या मानपानावरून मोठा वाद उफाळून आला. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची मुलगी तथा अभिनेत्री भाग्यश्री यांनी सकाळी मंदिरात जाऊन विधिवत पूजा व आरती केली. ही माहिती समजताच विजयसिंहराजेंनी तीव्र संताप व्यक्त केला. संस्थानच्या शेकडो वर्षांच्या परंपरेचा प्रश्न यावरून ऐरणीवर आला.

राजवाड्यातील दरबार हॉल येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यापूर्वी घडलेल्या घटनेवरून राजेसाहेबांनी तीव्र आक्षेप नोंदवला. पत्रकारांजवळ ते म्हणाले, ‘उत्सवमूर्तीची पूजा करण्याचा मान माझा आणि राणीसाहेबांचाच आहे. माझा मान डावलून भाग्यश्री हिमालय दासानी यांनी माझ्या अनुपस्थितीत आरती का केली? आणि यामागे काय राजकारण आहे, हे मला माहीत नाही. 'मी मुलगी आहे, काहीही करू शकते,' असा अविर्भाव कोणीही बाळगू नये.

शेकडो वर्षांची ही परंपरा मोडून चालणार नाही आणि सांगलीकरही हे खपवून घेणार नाहीत. यावेळी राजेसाहेबांनी वारसा हक्काबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ‘आदित्यराजे पटवर्धन यांनाच माझा व सांगली गादीचा वारस म्हणून सर्वांनी मान्य करावे. विनाकारण आदित्यराजेंच्या विरोधात कारस्थान करू नये, असा इशारा त्यांनी दिला.

वादाबद्दल भाग्यश्री यांच्याकडून प्रतिक्रिया नाही

श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी संताप व्यक्त केल्यानंतर दै.‘पुढारी’ने अभिनेत्री भाग्यश्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. त्यांचे पती हिमालय दासानी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी सध्या मुंबईत आहे. सांगली गणपती मंदिर येथे पूजेवरून झालेल्या वादाविषयी मला माहिती नाही. भाग्यश्री यांच्या स्वीय सहायकाशी संपर्क केला; मात्र, त्यांच्याकडूनही प्रतिक्रिया मिळाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT