सांगली : संस्थानच्या गादीच्या वारसाहक्काबाबतही संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार प्रक्रिया केली आहे. युवराज आदित्यराजे यांना कायदेशीर दत्तक घेतले आहे. त्यामुळे संस्थानच्या गादीचे पुढील एकमेव वारस युवराज आदित्यराजेच असल्याचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी निवेदनाद्वारे पुन्हा स्पष्ट केले. समस्त सांगलीकर आमच्या पाठीशी असल्याचा दावा निवेदनात आहे.
निवेदनात राजेसाहेब म्हणतात, संस्थानचा राजा हा Sole Managing Trustee आहे. संस्थानच्या धार्मिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या त्याच्याकडे असतात. पूर्वजांकडून आणि चिंतामणराव महाराज यांच्याकडून संस्थानच्या पूजा-अर्चा, रूढी व परंपरा समजून घेत त्या पुढे युवराज आदित्यराजे यांनाही सांगितल्या आहेत. ते शिकत आहेत.
राजेसाहेब यांची कन्या असलेली अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणपती मंदिरात येऊन आरती केल्यानंतर पटवर्धन घराण्यात वाद सुरू झालेला आहे. या आरतीबाबत निवेदनात राजेसाहेब म्हणतात, “उत्सवमूर्तीची पूजा आपण एक दिवस आधीच केली असताना दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजा व आरती का केली? ती करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? संस्थानच्या रूढी-परंपरांनुसार अशा प्रकारची कृती योग्य नाही.”
गुरुजींची माफी मागावी
संस्थानमध्ये गुरुजींना अत्यंत आदराचे स्थान असून, पूजा-अर्चेनंतर त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे संबंधित घटनेबाबत गुरुजींची भाग्यश्री हिमालय दासानी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
भाषा अपमानास्पद
संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी रूढी-परंपरांचा विचार करून पुन्हा आरती करू नये, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असताना, त्यांच्याशी अपमानास्पद भाषेत बोलल्याचा आरोपही राजेसाहेबांनी भाग्यश्री यांच्यावर केला आहे. अभ्यंकर हे राणीसाहेब यांचे भाचे असून, भाग्यश्री दासानी यांचे आतेभाऊ असूनही त्यांच्याशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आजारी नाही, प्रकृती व्यवस्थित
प्रकृतीबाबत माध्यमांमध्ये चुकीची माहिती दिल्याचा दावा श्रीमंत विजयसिंहराजे यांनी केला. मी आजारी किंवा बेडरिडन नसून प्रकृती व्यवस्थित आहे, असे नमूद केले. गणेशोत्सवातील सर्व पूजा-अर्चा आपण स्वतः पार पाडल्या असून, विविध कार्यक्रमांमध्येही सहभागी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मग भाग्यश्री दासानी यांनी राजेसाहेब आजारी आहेत, असे खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनात आहे.