सांगली : 'बाप्पाडॉटओआरजी' या पोर्टलवर आपल्या घरच्या आणि मंडळाच्या गणेशोत्सव परंपरेची नोंद करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाच्या डिजिटल दस्तऐवजीकरणात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. आपल्या गणेशोत्सव परंपरेची यशस्वी नोंदणी करणाऱ्या नागरिकांना 'डिजिटल कल्चरल प्रिझर्व्हर सर्टिफिकेट' देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता, सामाजिक एकता आणि लोकभावनेचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्राच्या या समृद्ध व गौरवशाली सांस्कृतिक परंपरेचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण व्हावे तसेच गणेशोत्सवाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा दर्जासाठीच्या प्रयत्नांना बळ मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत व्यापक लोकसहभागाची मोहीम राबविण्यात येत आहे.
या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक दस्तऐवजीकरण उपक्रमात सांगली–मिरज–कुपवाड शहरातील नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तिकार, कलाकार, कारागीर, गृहनिर्माण संस्था, महिला बचत गट तसेच विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाशी संबंधित कला, संस्कृती, परंपरा, चालीरीती, पूजा पद्धती, सजावट, मूर्तिकला आणि लोकसहभाग यांचे डिजिटल माध्यमातून जतन करण्यासाठी 'बाप्पाडॉटओआरजी' पोर्टल हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरगुती गणेशोत्सवाची तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परंपरेची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडीओ डिजिटल स्वरूपात नोंदविता येणार आहेत.
आपल्या घरात किंवा परिसरात अनेक वर्षांपासून जपल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या परंपरा, आरास, पूजा पद्धती, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची नोंद करून त्या पुढील पिढ्यांसाठी डिजिटल सांस्कृतिक ठेवा म्हणून जतन करण्याची ही संधी आहे.