जत : कुंभारी (ता. जत) येथे सराईत गुन्हेगार मधुकर ऊर्फ मध्या वाघमोडे याने पानपट्टी चालकास किरकोळ कारणावरून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत मारहाण केल्याची घटना घडली. पानपट्टी चालक, पेपर विक्रेते बाबुराव महादेव जाधव (वय 68) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यावेळी संशयिताने गोळीबार केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. परंतु, पोलिसांनी मात्र अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी संशयिताच्या अटकेसाठी विजापूर - गुहागर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक सूरज बिजली घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित संशयितावर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत संशयित मधुकर वाघमोडे याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
याबाबत माहिती अशी, कुंभारी येथे बाबुराव जाधव यांची पानपट्टी आहे. सायंकाळी सराईत गुन्हेगार मध्या वाघमोडे हा त्या ठिकाणी आला. त्याने जाधव यांच्याकडे गुटखा मागितला. यावेळी जाधव यांनी, मी गुटखा विक्री करत नाही, असे सांगितले. त्यावेळी वाघमोडे याने, गुटखा का देत नाहीस, अशी विचारणा करीत जाधव यांना मारहाण केली. जाधव आरडाओरड करीत असताना मध्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला. जाधव यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला. जमावाला पाहताच मध्या आणि त्याच्या साथीदारांनी तिथून पळ काढला.
जाधव यांना मारहाण झाल्याचे समजताच कुंभारीतील ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत मारहाण करणार्या संशयितास अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांची रांग लागली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक साळुंखे व पोलिस निरीक्षक बिजली यांनी जमावाची समजूत काढत संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कुंभारी येथील या मारहाणीच्या घटनेवेळी एका सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची चर्चा होती. याबाबत पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हवेत गोळीबार झाल्याबाबत ठोस अशी अद्याप माहिती मिळाली नाही. माहिती मिळाल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. दहशत व दबाव न बाळगता अशा घटनांविरुद्ध पोलिस ठाण्याशी संपर्क साधा.