Sangli Crime News
खडी क्रेशरचे लोखंडी पार्टच्या चोरीप्रकरणी तिघांना अटक File Photo
सांगली

सांगली : खडी क्रेशरचे लोखंडी पार्ट चोरणारी टोळी गजाआड

पुढारी वृत्तसेवा

विटा : खडी क्रेशरचे लोखंडी पार्ट चोरणारी कडेगाव तालुक्यातील येतगाव येथील एक टोळी विटा पोलिसांनी मंगळवारी (दि.९) जेरबंद केली. विट्यात नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगात निघालेल्या या टोळीच्या चारचाकी गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी टोळीतील तिघांना ताब्यात घेतले. महेश विष्णु पनासरे (वय २४), रोहन जयसिंग सावंत (वय १९), रणजित वसंत उथळे (वय २७) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत विटा पोलीस ठाण्याचे हवालदार प्रमोद मल्लाप्पा साखरपे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विट्यातील शिवाजी चौकात नाकाबंदी सुरू असताना भरधाव वेगाने तासगावकडून मायणीच्या दिशेने एक चारचाकी गाडी (नं. एम एच ए एफ ५६५२) निघाली होती. पोलिसांनी चालकाला इशारे करूनही ती गाडी चालकाने न थांबवल्यामुळे त्यांना संशय आला आणि त्यांनी ती पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीच्या चालकाकडे अधिक चौकशी केली असता गाडी फलटणच्या दिशेने जात आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र तो बोलताना थोडा अडखळयाचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी त्या गाडीमध्ये त्यांना खडी क्रेशरचे लोखंडी पार्टस आढळले. अधिक चौकशी दरम्यान त्याच्याकडे गाडीतील साहित्याच्या मालकीहक्काबाबत विचारणा केली असता त्याने त्या साहित्याचे खरेदीबाबत अथवा मालकीहक्काबाबत कोणतीही पूरक माहिती दिली नाही. यावरुन गाडीतील खडी क्रेशरचे लोखंडी पार्टस चोरीचे असल्याची खात्री पोलिसांना झाल्याने पोलिसांनी चालक महेश पनासरे आणि त्याचे दोन साथीदार रोहन सावंत आणि रणजित उथळे यांना अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT