सांगली

सांगली: कारखान्यांतील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अविनाश सुतार

विटा : पुढारी वृत्तसेवा : कारखान्यांतील गोदामातून साहित्य चोरणाऱ्या टोळीला विटा पोलिसांनी जेरबंद केले. आकाश विजेश गोसावी (वय २५), रविंद्र तुकाराम गोसावी (वय ३३) विनोद रामाप्पा गोसावी (वय ३०) आणि अनिल रामाप्पा गोसावी (वय २५. सर्व रा. म्हैसाळ, ता मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कडेगाव आणि विटा पोलिसांत दाखल चार गुन्हेही उघडकीस आले आहेत.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, विटा जवळील कार्वे एमआयडीसीत रोहन रामचंद्र जाधव यांचा पॉलिमर बॅगा तयार करण्याचा कारखाना आहे. दोन महिन्यांपूर्वी २५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात बंद गोडाऊनचा पत्रा उचकटून आत प्रवेश करून गोडाऊनमधील १ लाख ६५ हजारांच्या पॉलीमार असलेल्या बॅगा चोरीस गेल्याबाबत रोहन जाधव यांनी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तेव्हापासून पोलीस उपविभागीय अधिकारी पद्मा कदम आणि निरीक्षक संतोष डोके यांनी विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे अन्वेषन पथकातील पोलीस प्रमोद साखरपे यांना टीप मिळाली. त्याआधारे ही चोरी आकाश गोसावी, रविंद्र गोसावी, विनोद गोसावी आणि अनिल गोसावी यांनी संगनमताने केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या चारही जणांना गुन्हे प्रकटीकरण पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण, अनिल जाधव, उपनिरीक्षक विशाल येळेकर आणि सागर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, महेश देशमुख, संभाजी सोनवणे आणि अक्षय जगदाळे यांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांनी रोहन जाधव यांच्या कारखान्यातील चोरीची कबुली दिली.

त्यांच्याकडून ३ लाख ७१ हजार ८४० रुपये किंमतीच्या पांढऱ्या रंगाच्या १२८ पॉलीमर बॅगा, २ लाख ५० हजार रुपये किमतीचा टॅम्पो (एमएच.१०, टीटी. २५८०), २० हजारांचे ५०० किलो ग्रॅम वजनाचे लोखंडी स्क्रॅप, ११ हजार ५०० रुपयांचे वेल्डींग मशीन, २ हजार ५०० रुपयांचे किंमतीचे लाकडी टेबल असा एकूण ६ लाख ५५ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT