सांगली

Sangli DJ Ban: ‘डीजे’वर बंदी घाला

कायमस्वरूपी कडक नियमांची गरज; सांगलीतील नियोजन बैठकीत गणेशोत्सव मंडळे अन् नागरिकांचा सूर

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : केवळ गणेशोत्सवापुरताच मर्यादित न ठेवता सर्वच राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांत ‘डीजे’च्या वापरावर पूर्णपणे बंदी घालावी, अशी जोरदार मागणी सांगलीतील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी प्रशासनाकडे केली.

डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये मर्यादित आवाजात वाजवण्यास परवानगी द्यावी आणि उत्सवाच्या काळात विधायक उपक्रमांवर भर द्यावा, असा सूर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता व नियोजन बैठकीत उमटला. जिल्हाधिकारी मैनाक घोष, पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

डीजेऐवजी देखाव्यांना वेळ वाढवून द्या

बैठकीत अजित सूर्यवंशी म्हणाले, उत्सव काळात डीजे नकोच, त्याऐवजी नागरिकांना देखावे पाहण्यासाठी वेळेची मुदतवाढ मिळावी. तसेच, उत्सवाला गालबोट लावणाऱ्या विघ्नसंतोषी घटकांवर आणि नशाखोरांवर कडक देखरेख ठेवण्याची मागणी त्यांनी केली. नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी प्रशासनाकडून तातडीने निर्णय होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. फ्लेक्सबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे सांगत बाजारपेठेत चारचाकी वाहनांना बंदी घालण्याची मागणी नागरिकांनी केली. याशिवाय, बेवारस वाहने हटवणे, विसर्जन कुंडांची संख्या वाढवणे, खड्डे बुजवणे, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि महाप्रसादाची गुणवत्ता तपासणे या मुद्द्यांवर उपस्थितांनी प्रशासनाला धारेवर धरले.

डीजेच्या धडधडाटाने वृद्ध थेट रुग्णालयात

धामणी येथील अँजिओप्लास्टी झालेले वृद्ध नागरिक नवनाथ कोळी यांनी आपली आपबिती मांडली. गावात वाजणाऱ्या डीजेच्या प्रचंड आवाजामुळे त्रास झाल्याने त्यांनी अनेकांना डीजे बंद करण्याची विनंती केली होती. मात्र, डीजे न थांबल्याने प्रकृती बिघडून त्यांना दोन दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डीजे कसा नागरिकांच्या जीवावर उठत आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरण त्यांनी मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT