सांगलीत फळ महोत्सवाला प्रारंभ  
सांगली

Sangli News : सांगलीत फळ महोत्सवाला प्रारंभ

महाशिवरात्र, द्राक्ष दिनानिमित्त आयोजन

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः महाशिवरात्र, द्राक्ष दिनानिमित्त सांगली-मिरज रोडवरील कच्छी जैन भवन येथे भव्य फळ महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. या महोत्सवात जिल्हाभरातील शेतकरी सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे उद्घाटन खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित झाले.

द्राक्षांबाबत जनजागृती व्हावी, यासाठी महाशिवरात्र हा द्राक्ष दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ (पुणे), सांगली विभाग, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका, जिल्हा परिषद, सर्व ॲग्रीकल्चर डीलर व मॅन्युफॅक्चरर्स कंपनी व असोसिएशन यांनी पुढाकार घेऊन हा महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवात सर्व फळांचे आकर्षक प्रदर्शन, फळ सजावट स्पर्धा, पाककला स्पर्धा, फळांची चित्रकला स्पर्धा, आहार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, असे उपक्रम आयोजित केले आहेत. ग्राहकांसाठी ताजी, दर्जेदार फळे वाजवी दरात उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केलेे आहे.

खासदार पाटील म्हणाले, द्राक्षशेती ही जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. शेतीमाल निर्यात केंद्र मिरज येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे केंद्र सुरू झाल्यानंतर शेतीच्या विकासाला आणखी चालना मिळेल. द्राक्षशेती सध्या विविध कारणाने अडचणीतून जात आहे. ती सावरण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. द्राक्ष शेतकऱ्यांची कर्जे मोठ्या प्रमाणात आहेत. कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना झाला पाहिजे. उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी द्राक्ष बागायतदारांचे विविध प्रश्न मांडले. भारतात द्राक्षे व बेदाणा आयात थांबवण्यासाठी त्यावर आयात कर लागू करावा, निर्यात केंद्र उभारावे, यांसह विविध मागण्या यावेळी मांडल्या. रवींद्र मुडे, संजय जाधव आदी नियोजन करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT