दिलीप जाधव
कवठेमहांकाळ : साखरपट्टा आणि द्राक्षपंढरी अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात 2024-25 च्या तुलनेत 2025-26 या वर्षातील आकडेवारी पाहता, फळबाग लागवडीचा पीक पॅटर्न हळूहळू बदलत चालला आहे. डाळिंब, पेरू, केळी, आंबा, कलिंगड, नारळ, लिंबू, ॲव्होकॅडो आणि आवळा पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. द्राक्षे, सीताफळ, बोर, ड्रॅगन फ्रूट, चिकू, सफरचंद, फणस व पपई पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट होत आहे.
2024-25 मध्ये जिल्ह्यात एकूण 43 हजार 697 हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली होते. 2025-26 मध्ये हे क्षेत्र किंचित घटून 43 हजार 611 हेक्टरवर आले. एकूण क्षेत्र जवळपास स्थिर असले तरी पिकांच्या लागवडीमध्ये झालेला बदल लक्षणीय आहे. द्राक्ष हे जिल्ह्याचे मुख्य पीक असले तरी त्याच्या लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आहे. 2024-25 मध्ये 30,853.75 हेक्टर असलेले द्राक्षांचे क्षेत्र 2025-26 मध्ये 28,746.78 हेक्टरपर्यंत घसरले. जत तालुक्यातील 2 हजार 408, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील 606, अशा एकूण तब्बल 3 हजार 14 हेक्टरवरील द्राक्षबागा शेतकऱ्यांनी तोडून टाकल्या. मिरज तालुक्यात 932 आणि पलूस तालुक्यात 251 हेक्टर तसेच वाळवा आणि आटपाडी तालुक्यात थोड्या फार प्रमाणात द्राक्षक्षेत्र वाढले.
याउलट डाळिंब पिकाने मोठी झेप घेतली आहे. कमी पाण्यात येणारे हे पीक, तुलनेने चांगला दर आणि निर्यातीची संधी यामुळे डाळिंब शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. विशेषतः तासगाव, आटपाडी आणि जत तालुक्यांत डाळिंब लागवडीचा वेगाने विस्तार होत आहे. आंबा, पेरू आणि केळी या पिकांच्या क्षेत्रामध्येही वाढ दिसून येते. ही वाढ बाजारपेठेतील स्थिर मागणी आणि तुलनेने कमी जोखमीमुळे झाल्याचे तज्ञांचे मत आहे.