विटा : पुढारी वृत्तसेवा : खोटे लग्न लावून देत दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विट्यातील एका दलाल महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नवरदेव हरीश मोहन जाधव (वय ३३, रा. पलूस) यांच्या फिर्यादीवरून संबंधित वधू संगिता कृष्णा चव्हाण (रा. जि.पालघर), महिला एजंट वर्षा बजरंग जाधव (रा. सुलतानगादे, ता.खाना पूर), बंडू पुंडलिक साळुंखे, बजरंग गणपती साळुंखे आणि राजू आप्पू घारगे (सर्व रा. मंगसुळी, ता.अथणी, जि. बेळगाव) या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक अशी की, सांगली जिल्ह्यातील पलूस येथील हरीष जाधव यांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याचे प्रयत्न सुरू होते. याबाबत त्यांच्या मंगसुळी (कर्नाटक) येथे असलेल्या नातेवाईकांकडे विचारणा केली. त्यावेळी मंगसुळीतील बंडू साळुंखे याने सुलतानगादेची दलाल वर्षा जाधव हिच्याशी संपर्क केला. त्यानंतर जाधव यांचे मंगसुळी येथील नातेवाईक बंडू साळुंखे, बजरंग साळुंखे आणि राजू आप्पू घारगे यांच्या मध्यस्थीने २ लाख ५ हजार रूपये देण्याच्या बोलीवर पालघरच्या संगिता चव्हाण हिच्याशी हरीश जाधव याचे लग्न निश्चित करण्यात आले.
त्यानंतर हरीष आणि त्यांचे वडील मोहन यांनी सुलतानगादे येथे दलाल वर्षा हिच्याकडे रोख ४५ हजार रूपये दिले. त्यानंतर पलूस येथे उर्वरित १ लाख ६० हजार असे एकूण २ लाख ५ हजाराची रक्कम दिली. ही सर्व रक्कम हातात मिळाल्यानंतर १६ ऑगस्ट २०२२ रोजी हरीषचा पालघरच्या संगिता चव्हाण हिच्याशी लग्न झाले. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हरीष यांच्या पलूस येथील घरी कोणी नसल्याची संधी साधून रात्रीच्यावेळी संगिता घरातून बाहेर पडून थेट बाहेर पडली आणि तिने किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन गाठले. त्या वर हरीषच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता ती किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर सापडली. त्याचक्षणी त्यांनी संगिताला दलाल वर्षा जाधव हिच्या स्वाधीन केले आणि झाल्या प्रकारात नंतर आता हरीष आणि त्यांच्या वडीलांनी हरीषचे दुसऱ्या एखाद्या मुलीशी लग्न लावून द्या नाहीतर दिलेले दोन लाख पाच हजार रूपये परत द्यावेत, असा तगादा दलाल वर्षा जाधव हिच्यामागे लावला. त्यावर वर्षा जाधव हिने पैसे परत करतो असे सांगून चार – पाच महिने टोलविले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हरीष यांनी थेट विटा पोलीस ठाणे गाठले.