Financial scam Pudhari
सांगली

Sangli Bunty Babli case‌: ‘बंटी-बबली‌’च्या मिरजेतील घरावर छापे

क्रिप्टो करन्सी, जमीन विक्रीतून फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : क्रिप्टो करन्सी, जमीन विक्री प्रकरणातील फसवणुकीसह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या मिरजेतील डॉ. इब्राहिम महंमदसाब नायकवडी-इनामदार (वय 51) व जस्मिन इब्राहिम नायकवडी-इनामदार (वय 41, रा. गुरूवार पेठ, छलवादी गल्ली, मिरज) या बंटी-बबलीच्या जोडीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पथकाने मिरज येथील त्यांच्या घरावर छापा टाकून तपासणी केली.

दरम्यान, अनेकांची फसवणूक करणाऱ्या या बंटी-बबलीचे विविध कारनामे तपासात पुढे येणार आहेत. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यात रक्कम दुप्पट करून देतो, असे सांगून इब्राहिम नायकवडी, त्याचा भाऊ अब्दुल महंमदसाब नायकवडी, इब्राहिमची पत्नी जास्मिन नायकवडी यांनी फसवणूक केल्याची तक्रार इचलकरंजी येथील सादिक कोचरगी यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात दिली होती. तिघांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकदारांची तब्बल 2 कोटी 15 लाख 55 हजारांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले होते. या प्रकरणात अब्दुल नायकवडी याला पोलिसांनी अटक केली होती. परंतु इब्राहिम व जास्मिन ही जोडी पोलिसांना गुंगारा देत होती.

दरम्यान, इब्राहिम व जास्मिन यांनी सांगलीतील अशोक मासाळे यांच्या श्री डेव्हलपर्स ॲन्ड कन्सलटंट या फर्मकडे जागा विकसित करण्यासाठी करार केला होता. त्यासाठी रक्कम घेतली होती. परंतु प्रत्यक्षात करार पूर्ण न करता मासाळे यांची 36 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. कारवाईच्या भीतीने हे दाम्पत्य गेल्या चार वर्षापासून फरार होते. अखेर विश्रामबाग पोलिसांनी मासाळे यांच्या मदतीने त्यांना गोवा येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांची रवानगी कारागृहात केली होती. त्यानंतर आता सुमारे अडीच कोटीच्या फसवणुकीत आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांना सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या पथकाने मिरजेत त्यांच्या आलिशान बंगल्यावर छापा टाकून तपासणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT