कोल्ह्याच्या हल्ल्यात दृष्टी गमावली; वनविभागाकडून ७.५१ लाखांची भरपाई 
सांगली

Sangli News : कोल्ह्याच्या हल्ल्यात दृष्टी गमावली; वनविभागाकडून ७.५१ लाखांची भरपाई

आठ महिन्यांपूर्वी मोराळेतील तलाव परिसरात घडली होती घटना

पुढारी वृत्तसेवा

मांजर्डे : मोराळे (ता. तासगाव) येथे आठ महिन्यांपूर्वी कोल्ह्याच्या हल्ल्यात डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या विठ्ठल गोपाळ बुरगुले यांना वन विभागाकडून मंजूर झालेली ७ लाख ५१ हजार रुपयांची नुकसान भरपाई सुपूर्द करण्यात आली. माजी खासदार संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्याहस्ते या मदतीचा धनादेश बुरगुले यांना प्रदान करण्यात आला.

आठ महिन्यांपूर्वी गावातील तलाव परिसरात विठ्ठल बुरगुले यांच्यावर कोल्ह्याने अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना आपली दृष्टी गमवावी लागली होती. माजी खासदार संजय पाटील म्हणाले, वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थांची सुरक्षा धोक्यात येत आहे. कोल्ह्यांसारख्या प्राण्यांचे अचानक होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब असून, शेतकऱ्यांना यामुळे मोठा शारीरिक आणि आर्थिक फटका बसतो. वनविभागाने अशा भागात तत्काळ बंदोबस्त करून उपाययोजना कराव्यात.

या वेळी राजाराम पाटील म्हणाले, वन्यप्राण्यांचा वाढता वावर आणि त्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शासनाने ठोस धोरण आखावे. वनविभागाने बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून दिली ही स्वागतार्ह बाब असली, तरी वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

कार्यक्रमास तासगावच्या वन अधिकारी कल्पना पाटील, नवनाथ कांबळे, भोपाळ पाटील, सभापती अरुणा पाटील, उपसभापती सुखदेव पाटील, उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, प्रमोद शेंडगे, महेश पाटील, भालचंद्र पाटील, माणिक बुरगुले, बाजीराव पाटील, भारत पाटील व महादेव पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश गायकवाड यांनी केले, तर आभार राजाराम पाटील यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT